Dinesh karthik: दिनेश कार्तिकची निवृत्ती

भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने शनिवारी आपल्या ३९व्या वाढदिवशी स्पर्धात्मक क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती पत्करली.
Dinesh karthik: दिनेश कार्तिकची निवृत्ती
Twitter

चेन्नई: भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने शनिवारी आपल्या ३९व्या वाढदिवशी स्पर्धात्मक क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती पत्करली. जवळपास दोन दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या दिनेश कार्तिकने आपल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला यंदा आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.

"बऱ्याच काळापासून माझ्या मनात विविध विचार येत आहेत. त्यामुळेच मी स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी अधिकृतपणे माझी निवृत्ती जाहीर करत आहे. आता जीवनात येणाऱ्या नव्या अडथळ्यांना सामोरा जाण्यासाठी मी सज्ज झालो आहे," असे कार्तिकने म्हटले आहे.

भारताकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात जवळपास १८० सामन्यांत प्रतिनिधित्व करताना त्याने ३६६३ धावा केल्या आहेत. त्यात कसोटीतील एकमेव शतक आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. यष्ट्यांमागे कार्तिकच्या नावावर १७२ विकेट्स आहेत. २००४मध्ये सौरव गांगुलीच्या गोलंदाजीवर मायकेल वॉनला यष्टीचीत बाद केल्यानंतर दिनेश कार्तिक खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. तो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२२ टी

२० वर्ल्डकपमध्ये भारताकडून अखेरचा सामना खेळला होता. त्यादरम्यान तो राहुल द्रविड, अनिल कुंबळे, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बरेच सामने खेळला होता.

"माझे प्रशिक्षक, कर्णधार, निवड समिती सदस्य तसेच सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सहकाऱ्याचा मी आभारी आहे. त्यांच्यामुळेच क्रिकेटचा हा प्रदीर्घ प्रवास मला मनापासून अनुभवता आला." २००७चा इंग्लंड दौरा कार्तिकसाठी संस्मरणीय ठरला. त्याने वासिम जाफरच्या साथीने सलामीला येत तीन कसोटी सामन्यांत तीन अर्धशतकांसह २६३ धावा केल्या होत्या. त्याआधी त्याने बांगलादेशविरुद्ध कसोटीतील एकमेव शतक साजरे केले होते.

वडील कृष्णकुमार कुवेतमध्ये काम करत असल्यामुळे शालेय दिवसांत त्यालाही तेथेच राहावे लागले. नंतर कार्तिकच्या सर्व सामन्यांसाठी त्याची आई हजेरी लावत होती. "माझे आई-वडील हेच माझ्यासाठी प्रमुख आधार होते. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी इथवर मजल मारू शकलो. पत्नी दीपिका पल्लिकल हिनेही मला व्यावसायिक खेळाडू बनवण्यात खूप मदत केली. स्क्वॉश खेळाडू दीपिकाने माझ्यासाठी तिची कारकीर्द काही काळ थांबवली होती," असे सांगत त्याने चाहत्यांचेही आभार मानले.

logo
marathi.freepressjournal.in