देशवासीयांचा अपेक्षाभंग केल्यामुळे निराश : सिंधू
पॅरिस : भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला गुरुवारी महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत (राऊंड ऑफ १६) चीनच्या ही बिंग जिआओने पराभूत केले. यामुळे सिंधूचे सलग तिसऱ्या ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न भंगले. सिंधूनेसुद्धा याविषयी नाराजी व्यक्त करतानाच चाहत्यांची माफीही मागितली.
“सर्वांनाच माझ्याकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र या लढतीत माझ्याकडून असंख्य चुका झाल्या. मला पराभव मान्य करावा लागेल. मात्र मी इतक्या सहज हार मानणार नाही. काही काळासाठी विश्रांती घेऊन पुन्हा कोर्टवर परतेन,” असे सिंधू म्हणाली. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य, तर २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने कांस्यपदक पटकावले होते. त्याशिवाय पुरुष दुहेरीत सात्विकसाइराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनाही उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे आता फक्त पुरुष एकेरीत लक्ष्य सेनवरच भारताच्या आशा टिकून आहेत.

