'दिसे चंद्राची प्रभा ढवळी'...

आपले आव्हान शाबूत राखण्यासाठी आता भारताला रविवारी स्पेनविरुध्द क्रॉसओव्हरचा सामना खेळावा लागेल.
'दिसे चंद्राची प्रभा ढवळी'...

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत अत्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या उत्कंठावर्धक सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून ३-४ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ‘टॉप-एट’मध्ये प्रवेशाची म्हणजेच थेट उपांत्यपूर्व फेरीची भारताची अपेक्षा पुरती मावळली. भारतावर सतत पेनल्टी कॉर्नरचा वर्षाव झाल्याने ‘दिसे चंद्राची प्रभा ढवळी...’ असे लख्ख जाणवत असताना अखेरीस चक्क अंधःकार भासावा, तसेच झाले, जणू. किवीजविरूद्ध एकदाही विजय न मिळण्याची विलक्षण परंपराही अनपेक्षितपणे अबाधित राहिली. तरीही भारतीय रणरागिणींचा जोश पाहता क्रॉसओव्हच्या लढतींमध्ये ‘दिसे चंद्राची प्रभा ढवळी... ' हे आशादायक चित्र अद्यापही कायम आहे, खचितच.

आपले आव्हान शाबूत राखण्यासाठी आता भारताला रविवारी स्पेनविरुध्द क्रॉसओव्हरचा सामना खेळावा लागेल. हा सामना जिंकल्यास उपांत्यपूर्व फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुध्द लढत द्यावी लागेल. हे दोन्ही सामने जिंकल्यास भारत मग विजेतेपदापासून दोन पावले म्हणजे दोन सामनेच दूर असेल. स्पेनविरुध्दची भारताची आकडेवारी भारतीयांची ‘छोटीसी आशा’ उंचावणारी अशीच आहे. स्पेनविरुध्दचे १७ पैकी सात सामने भारताने जिंकले आहेत, तर स्पेनने पाच सामन्यात विजय मिळविला आहे. उर्वरित सामने अनिर्णित राहिले आहेत. या स्पर्धेत १६ संघांना प्रत्येकी चार संघांच्या चार गटांमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक पूलमधील टॉप संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये क्रॉसओव्हर लढती होणार आहेत.

पूल ‘अ’ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेला संघ पूल ‘ड’ मध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी खेळेल, तर पूल ‘अ’ मध्ये तिसऱ्या स्थानावर असलेला संघ पूल ‘ड’ मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी खेळेल. त्याचप्रमाणे पूल ‘ब’ मध्‍ये दुसऱ्या क्रमांकावरील संघाचा सामना ‘क’ गटातील तिसऱ्या क्रमांकावरील संघाशी होईल, तर पूल ‘ब’मध्‍ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला संघ पूल ‘क’ मधील दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी खेळेल. या चार सामन्यांतील विजेते मग उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. भारत आपल्या गटात तिसऱ्या स्थानावर राहिल्याने भारताला क्रॉसओव्हरच्या सामन्यांमध्ये स्थान मिळविण्यात यश आले. भारत आणि चीन या दोघांचेही प्रत्येकी दोन गुण झाले. परंतु भारताने सरस गोलफरकाच्या आधारे क्रॉसओव्हरसाठी पात्रता मिळविली, हेही नसे थोडके. न्यूझीलंड संघ सात गुणांसह पूल ‘ब’ मध्ये अव्वल राहिला. त्यामुळे तो थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. इंग्लंडने चार गुणांसह दुसरे स्थान मिळविले.

न्यूझीलंडविरूध्दच्या महत्त्वपूर्ण सामन्यात अनुभवी गोलरक्षक सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली महिला हॉकी विश्वचषक खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंनी न्यूझीलंडविरुध्द तशी अखेरपर्यंत झुंज दिली. म्हणूनच पराभव अनपेक्षित धक्का देणारा ठरला. चवळीच्या शेंगांप्रमाणे कोवळ्या असलेल्या या खेळाडू धिप्पाड प्रतिस्पर्ध्यांशी अक्षरश: रणरागिणींप्रमाणे शेवटच्या सेकंदापर्यंत लढल्या, असे म्हटले तरी ते अप्रस्तुत ठरणार नाही. अनेक चढ-उतारांनी ठासून भरलेल्या या ‘डिंग डाँग’ सामन्यात अगदी अखेरच्या सेकंदालाही भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. आता बोला! दुर्दैवाने, सामना बरोबरीत नेण्यात या पेनल्टी कॉर्नरचा मात्र उपयोग होऊ शकला नाही. रेफरल घेऊनही निकाल भारताच्या विरोधात गेला. न्यूझीलंड ४-३ ने विजयी ठरला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता झाला.

शेवटच्या मिनिटाला तर चंचल ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरने चपळाईने गोल डागून सनसनाटी निर्माण केली होती. या गोलद्वारे गुरजीत कौरने स्पर्धेतील आपल्या गोलचे खाते उघडले होते. तिसरा क्वार्टर संपण्यास अवघा एक मिनिट शिल्लक असताना लैरेमसियामीनेही एका लटपट-लटपट पासवर असा काही झटपट फटका लगावला होता की चेंडू गोलकीपरला चकवून डोळ्याचे पाते लवते न लवते तोच जाळ्यात पोहोचला होता. या डौलदार गोलमुळे भारताला पिछाडी कमी करता आली होती.

या विश्वचषकात भारतीय संघाने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. भारताचे दोन सामने अनिर्णित राहिले, तर न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी पॉइंट्स टेबलमध्ये भारतीय संघ दोन गुणांसह पूल ब मध्ये तिसऱ्या स्थानावर होता. चीन आणि न्यूझीलंड त्याहून वर होते. ब गटात अव्वल स्थान मिळविण्यासाठी भारताला न्यूझीलंडवर विजय आवश्यक होता आणि त्याचवेळी चीनचा इंग्लंडविरुद्ध पराभव गरजेचा होता. पण या शक्यता निरर्थक ठरल्या. भारताकडून वंदना कटारियाने आतापर्यंत केवळ दोन गोल केले होते.

तिने निर्णायक सामन्यात चौथ्या मिनिटालाच आणखी एक गोल डागला. त्यामुळे भारताला सुरूवातीलाच आघाडी मिळाली. या आघाडीचे भांडवल करून प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दबाव टाकण्याची संधी मात्र हातची निसटली गेली. लैरेमसियामी (४४ वे मिनिट) आणि गुरजीत कौर (५९ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पण या तिघींची तीन गोलची ही कामगिरी विजय मिळवून देण्यात तोकडी पडली. अगदी तीन तिघाड काम बिघाडच झाले, म्हणा ना!

सुरुवातीलाच मिळालेल्या आघाडीचा प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण करण्यात भारतीय खेळाडूंना यश आले असते किंवा पेनल्टी कॉर्नर्सद्वारे मिळालेल्या संधींचे सोने केले असते, तर अपेक्षित असेच घडले असते, हमखास. वास्तविक, किवींना पराभूत करणे तसे सोपेही नव्हते. स्पर्धेत भारत अद्याप एकही सामना जिंकलेला नाही, या मानसिकतेतून आलेले मोठे दडपण भारतीय खेळाडूंवर होते. त्यातच आकडेवारीही मनात धडकी भरवणारी अशीच होती. या प्रचंड दबावामुळेच की काय, पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यात भारतीयांना अपयश आले असावे, कदाचित.

भारत-न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यापैकी सर्व १३ सामने न्यूझीलंडने जिंकलेले होते. यामुळे आलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावरच त्यांनी भारताला चौदावे रत्न दाखविले. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी केलेल्या शानदार खेळाचेही कौतुक करावे लागेल. न्यूझीलंडसाठी ओलीविया मॅरीने (१२ वे आणि ५४ वे मिनिट) दोन गोल केले. टेसा योप (२९ वे मिनिट) आणि फ्रांसिस डेव्हिस (३२ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. आक्रमकतेवर भर देत असतानाच त्यांनी तितकाच संयमही राखला. अंतिम सत्रात तर त्यांनी गोंधळून न जाता कमालीचे मनोधैर्य दाखविले.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील भारताचे सुरुवातीचे दोन्ही सामने अनिर्णित राहिले होते. दोन्ही सामन्यात भारतीय बचावफळीने मात्र चमकदार कामगिरी केली होती. फॉरवर्ड आणि मिडफिल्डर्सनी थोडीशी निराशा जरूर केली होती म्हणा; पण निर्णायक सामन्यात या खेळाडूंनी आपली कसर बॅकलॉगप्रमाणे भरून काढली. न्यूझीलंडविरुध्द हार पत्करावी लागली; पण पुढील सामन्यासाठी आत्मविश्वासाची शिदोरीसुध्दा मिळाली. चेंडूवर कब्जा करण्याचे आणि त्यावर नियंत्रण मिळविण्याचे भारतीय खेळाडूंचे कसब अप्रतिम होते. म्हणूनच अजूनही विश्वचषकाची आशा कायम आहे. ‘दिसे चंद्राची प्रभा ढवळी... ’ असे सुरुवातीलाच म्हटले, ते याचसाठी! तेव्हा पुढील सर्व सामन्यांसाठी ‘निर्मळ-कोमल; पण अंगी तेज अनमोल’ असलेल्या या रणरागिणीना मनःपूर्वक शुभेच्छा!

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in