मुंबई : चारचौघी मित्र मंडळातर्फे आयोजित पुरुषांच्या द्वितीय श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत आंबेवाडी क्रीडा मंडळ, नवनाथ क्रीडा मंडळ आणि आकांक्षा मंडळ यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आंबेवाडीने संस्कृती प्रतिष्ठानला ३२-२९ असे पराभूत केले. मध्यांतराला त्यांच्याकडे १९-१३ अशी आघाडी होती. धनंजय निजामपूरकर, हिमांशू राऊत यांनी दमदार खेळ केला. नवनाथ मंडळाने ओम श्रीसाईनाथ सेवा ट्रस्टवर २८-२१ असा विजय मिळवला. अभिषेक नलावडे, सिद्धेश कदम त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. आकांक्षा मंडळने दादोजी कोंडदेव स्पोर्ट्सला ४०-३३ असे हरवले. अफताब पठाण, उत्कर्ष पेयर यांनी छाप पाडली.
तृतीय श्रेणी गटात यंग उमरखाडी गटाने एफ युनायटेडवर ३४-३३ अशी सरशी साधली, तर ज्ञानेश्वर मंडळाने मराठा मित्र मंडळाचा ४६-३० असा पराभव केला. याव्यतिरिक्त गणेश व्यायाम शाळा व बाळ गोपाळ संघाने आगेकूच केली.