अंतिम फेरी रंगतदार स्थितीत! दिव्या-हम्पी यांच्यातील दुसरा डावही बरोबरीत; आज टायब्रेकरद्वारे निकाल

बुद्धिबळातील नवी राणी कोण ठरणार, याचा निकाल सोमवारी लागणार आहे. उभय खेळाडूंत शनिवारी पहिला डाव बरोबरीत सुटला होता. त्यानंतर रविवारी दुसऱ्या डावातही ३४ चालींनंतर दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली. त्यामुळे दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यातील विजेती ठरवण्यासाठी आज टायब्रेकरचा अवलंब करावा लागणार आहे.
अंतिम फेरी रंगतदार स्थितीत! दिव्या-हम्पी यांच्यातील दुसरा डावही बरोबरीत; आज टायब्रेकरद्वारे निकाल
Photo : X (@FIDE_chess)
Published on

बटुमी (जॉर्जिया) : बुद्धिबळातील नवी राणी कोण ठरणार, याचा निकाल सोमवारी लागणार आहे. जॉर्जिया येथे सुरू असलेल्या महिलांच्या फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामना दुसऱ्या डावानंतरही बरोबरीत आहे. त्यामुळे दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यातील विजेती ठरवण्यासाठी सोमवारी टायब्रेकरचा अवलंब करावा लागणार आहे.

इतिहासात प्रथमच भारताच्या दोन महिलांनी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. नागपूरच्या १९ वर्षीय हम्पीने चीनच्या तिसऱ्या मानांकित टॅन झोंगोईला १.५-०.५ असे नमवले होते. १५वी मानांकित दिव्या ही विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारी पहिलीच भारतीय महिला ठरली होती. त्यानंतर चौथ्या मानांकित हम्पीने चीनच्या अग्रमानांकित लेई टिंगेईवर टायब्रेकरमध्ये ५-३ अशी मात केली. दोन्ही खेळाडूंत पहिले दोन दिवस बरोबरी कायम होती. अखेरीस टायब्रेकरमध्ये हम्पीने बाजी मारली. त्यामुळे या दोघीही कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.

२०२१पासून महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषकाला प्रारंभ झाला. यापूर्वी फक्त पुरुषांसाठीच विश्वचषक खेळवण्यात यायचा. यापूर्वी २०२१ व २०२३ मध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषकात भारताची एकही खेळाडू उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचली नव्हती. यंदा मात्र भारताच्या दोन जणींनी थेट अंतिम फेरीत मजल मारून बुद्धिबळातील देशाची ताकद सिद्ध केली आहे. महिला विश्वचषकातील अव्वल तीन खेळाडू (विजेती, उपविजेती, तिसऱ्या क्रमांकावरील) पुढील वर्षी होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. कँडिडेट्स स्पर्धेतील विजेता मग जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत गतविजेतीशी दोन हात करेल. तिसऱ्या क्रमांकाची लढत जिंकून खेळाडूंना कँडिडेट्सची पात्रता मिळवण्याची संधी आहे. एप्रिलमध्ये कँडिडेट्स स्पर्धा होईल. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात महिलांची जागतिक बुद्धिबळ लढत रंगेल.

दरम्यान, उभय खेळाडूंत शनिवारी पहिला डाव बरोबरीत सुटला होता. त्यानंतर रविवारी दुसऱ्या डावातही ३४ चालींनंतर दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली. आता सोमवारी टायब्रेक्समध्ये कमी वेळेत रॅपिड प्रकारात बुद्धिबळ खेळवण्यात येईल. पहिल्या टायब्रेकमध्ये १५ व १० डाव होतील. मग बरोबरी कायम राहिली, तर दुसरा टायब्रेक प्रत्येकी १०-१० रॅपिड डावांचा होईल. सोमवारी ४.३० वाजता टायब्रेकरला सुरुवात होईल.

एकंदर गेल्या काही वर्षांत भारताने बुद्धिबळात दुहेरी प्रगती केली आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने दुहेरी विजेतेपद पटकावले. मग डिसेंबरमध्ये भारताच्या गुकेशने जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली. महिलांमध्ये २०२४ या वर्षात भारताच्या हम्पी, वैशाली यांनी अनुक्रमे जलद व ब्लिट्झ प्रकारात विजेतेपद मिळवले. या सर्वांचे फळ म्हणूनच भारताला पुन्हा एकदा पुरुषांच्या विश्वचषकाचे यजमानपद लाभले आहे. भारताने यापूर्वी २०२२मध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाड, टाटा स्टील चेस, २०२४मध्ये कनिष्ठ जागतिक स्पर्धा आणि एप्रिल २०२५मध्ये महिलांची ग्रँड प्रिक्स अशा विविध जागतिक पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धांचे यजमानपद भूषवलेले आहे.

logo
marathi.freepressjournal.in