
बटुमी (जॉर्जिया) : महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत सोमवारचा दिवस भारतासाठी दुहेरी पराक्रमाचा ठरला. नागपूरची दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांनी बुद्धिबळात भारतीय महिलाही कमी नसल्याचे दाखवून दिले. १९ वर्षीय दिव्या आणि ३८ वर्षीय हम्पी यांनी जॉर्जिया येथे सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेची प्रथमच उपांत्य फेरी गाठली. भारतातर्फे प्रथमच दोन महिला खेळाडूंनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याची किमया साधली.
२०२१पासून महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषकाला प्रारंभ झाला. यापूर्वी फक्त पुरुषांसाठीच विश्वचषक खेळवण्यात यायचा. यापूर्वी २०२१ व २०२३मध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषकात भारताची एकही खेळाडू उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचली नव्हती. यंदा मात्र भारताच्या चार महिला उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाल्याने त्यांच्यापैकी कोणीतरी नक्कीच इतिहास रचणार, याची खात्री होती. यामध्ये अखेरीस हम्पी व दिव्या यांनी बाजी मारली. द्रोणावल्ली हरिका आणि आर. वैशाली यांचे आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
या स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात १६व्या मानांकित दिव्याने भारताच्याच १०व्या मानांकित हरिकाला सोमवारी सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. रविवारी उभय खेळाडूंत पहिला गेम बरोबरीत सुटला होता. मात्र सोमवारी दिव्याने ३-१ अशी बाजी मारली. आता दिव्यासमोर उपांत्य फेरीत चीनच्या तिसऱ्या मानांकित टॅन झोंगोईचे कडवे आव्हान असेल. टॅन ही २०२४मध्ये कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. त्यामुळे दिव्या तिला रोखणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
“मी आज अपेक्षेप्रमाणे खेळ केला. विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणे स्वप्नवत असले, तरी माझे ध्येय अद्याप साध्य झालेले नाही. माझ्या आईच्या पाठिंब्याशिवाय मी इथवर मजल मारू शकले नसते. हम्पीदिदीचेही अभिनंदन. भारताच्या दोन महिला प्रथमच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल होणे, ही फार अभिमानास्पद बाब आहे,” असे दिव्या विजयानंतर म्हणाली. दिव्याने उपउपांत्यपूर्व लढतीत चीनच्या झू जिनरला धक्का दिला होता. तसेच गतवर्षी भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे दुहेरी जेतेपद पटकावले. त्यावेळी महिला संघात दिव्याचाही समावेश होता. ३४ वर्षीय हरिकाला मात्र दिव्याकडून पराभूत झाल्याने स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.
दरम्यान, अन्य उपांत्यपूर्व लढतीत चौथ्या मानांकित अनुभवी हम्पीने चीनची आंतरराष्ट्रीय मास्टर युशीन साँगवर १.५-०.५ असा विजय मिळवला. पहिल्या डावात विजय मिळवल्यानंतर हम्पीने दुसऱ्या डावात साँगला बरोबरीत रोखले. भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर ठरण्याच मान मिळववणाऱ्या हम्पीची आता उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लेई टिंगेईशी गाठ पडेल. त्यामुळे या दोन तुल्यबळ खेळाडूंमधील द्वंद्वाकडे तमाम बुद्धिबळप्रेमींचे लक्ष असेल. एकंदर भारताच्या दोन्ही बुद्धिबळपटूंना अंतिम फेरी गाठण्याची सुवर्णसंधी असून दिव्या व हम्पी देशवासीयांचा विश्वास सार्थ ठरवतील, अशी आशा आहे.
कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची संधी
महिला विश्वचषकातील अव्वल तीन खेळाडू (विजेती, उपविजेती, तिसऱ्या क्रमांकावरील) पुढील वर्षी होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. कँडिडेट्स स्पर्धेतील विजेता मग जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत गतविजेतीशी दोन हात करेल. भारताच्या दिव्या किंवा हम्पीपैकी एकीनेही उपांत्य लढत जिंकल्यास, त्या कँडिडेट्ससाठी पात्र ठरतील. तसेच उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतरही तिसऱ्या क्रमांकाची लढत जिंकून त्यांना कँडिडेट्सची पात्रता मिळवण्याची संधी आहे. २०२६च्या एप्रिलमध्ये कँडिडेट्स स्पर्धा होईल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात महिलांची जागतिक बुद्धिबळ लढत रंगेल. २०२५मध्ये झालेल्या महिलांच्या जागतिक स्पर्धेत चीनच्या जू वेन्जूनने जेतेपद काबिज केले.