FIDE Women’s World Cup : महाराष्ट्राच्या दिव्याची अंतिम फेरीत धडक

महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने ऐतिहासिक पराक्रम केला. ती बुद्धिबळ विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारी भारताची पहिली महिला ठरली आहे.
FIDE Women’s World Cup : महाराष्ट्राच्या दिव्याची अंतिम फेरीत धडक
Photo : X (@PawarSpeaks)
Published on

बटुमी (जॉर्जिया) : महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने ऐतिहासिक पराक्रम केला. ती बुद्धिबळ विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारी भारताची पहिली महिला ठरली आहे. याबरोबरच १९ वर्षीय दिव्याने २०२६च्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

२०२१पासून महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषकाला प्रारंभ झाला. यापूर्वी फक्त पुरुषांसाठीच विश्वचषक खेळवण्यात यायचा. यापूर्वी २०२१ व २०२३मध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषकात भारताची एकही खेळाडू उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचली नव्हती. यंदा मात्र भारताच्या चार महिला उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाल्याने त्यांच्यापैकी कोणीतरी नक्कीच इतिहास रचणार, याची खात्री होती. यामध्ये अखेरीस हम्पी व दिव्या यांनी बाजी मारली. द्रोणावल्ली हरिका आणि आर. वैशाली यांचे आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.

या स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात १६व्या मानांकित दिव्याने भारताच्याच १०व्या मानांकित हरिकाला सोमवारी सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. होते. रविवारी उभय खेळाडूंत पहिला गेम बरोबरीत सुटला होता. मात्र सोमवारी दिव्याने ३-१ अशी बाजी मारली. दिव्यासमोर उपांत्य फेरीत चीनच्या तिसऱ्या मानांकित टॅन झोंगोईचे कडवे आव्हान होते.

मंगळवारी उभय खेळाडूंतील पहिला गेम बरोबरीत सुटला होता. मात्र बुधवारी दिव्याने सर्वस्व पणाला लावून विजय मिळवला. दिव्याने टॅनला १.५-०.५ असे पराभूत केले.

दिव्याने उपउपांत्यपूर्व लढतीत चीनच्या झू जिनरला धक्का दिला होता. तसेच गतवर्षी भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे दुहेरी जेतेपद पटकावले. त्यावेळी महिला संघात दिव्याचाही समावेश होता. ३४ वर्षीय हरिकाला मात्र दिव्याकडून पराभूत झाल्याने स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

दरम्यान, अन्य उपांत्यपूर्व लढतीत चौथ्या मानांकित अनुभवी हम्पीने चीनची आंतरराष्ट्रीय मास्टर युशीन साँगवर १.५-०.५ असा विजय मिळवला. पहिल्या डावात विजय मिळवल्यानंतर हम्पीने दुसऱ्या डावात साँगला बरोबरीत रोखले. भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर ठरण्याच मान मिळववणाऱ्या हम्पीची आता उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लेई टिंगेईशी गाठ पडली आहे. त्यामुळे या द्वंद्वाकडे तमाम बुद्धिबळप्रेमींचे लक्ष आहे.

महिला विश्वचषकातील अव्वल तीन खेळाडू (विजेती, उपविजेती, तिसऱ्या क्रमांकावरील) पुढील वर्षी होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. कँडिडेट्स स्पर्धेतील विजेता मग जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत गतविजेतीशी दोन हात करेल. भारताच्या दिव्याने आता अंतिम फेरी गाठल्याने ती कँडिडेट्ससाठी पात्र ठरली आहे. आता हम्पीसुद्धा अंतिम फेरी गाठणार का, हे पाहणे रंजक ठरेल. तसेच उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतरही तिसऱ्या क्रमांकाची लढत जिंकून खेळाडूंना कँडिडेट्सची पात्रता मिळवण्याची संधी आहे. एप्रिलमध्ये कँडिडेट्स स्पर्धा होईल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात महिलांची जागतिक बुद्धिबळ लढत रंगेल.

logo
marathi.freepressjournal.in