विश्वविजयाच्या वाटचालीत प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान! ग्रँडमास्टर दिव्याकडून कारकीर्दीतील गुरूंना जेतेपद समर्पित

नागपूरची १९ वर्षीय विश्वविजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचे बुधवारी भारतात आगमन झाले. मुंबई विमानतळाहून नागपूरला रवाना झाल्यावर तेथे तिच्या स्वागतासाठी चाहत्यांची गर्दी उसळली होती. यावेळी दिव्याची आईसुद्धा उपस्थित होती.
विश्वविजयाच्या वाटचालीत प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान! ग्रँडमास्टर दिव्याकडून कारकीर्दीतील गुरूंना जेतेपद समर्पित
Published on

मुंबई : नागपूरची १९ वर्षीय विश्वविजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचे बुधवारी भारतात आगमन झाले. मुंबई विमानतळाहून नागपूरला रवाना झाल्यावर तेथे तिच्या स्वागतासाठी चाहत्यांची गर्दी उसळली होती. यावेळी दिव्याची आईसुद्धा उपस्थित होती. गुरुवारी दिव्याने फिडेला (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) दिलेल्या मुलाखतीत कारकीर्दीच्या विविध टप्प्यावर लाभलेल्या गुरूंचे आभार मानून त्यांना जेतेपद समर्पित केले. तसेच ती विजयी मिरवणूकीत बालपणीचे दिवगंत प्रशिक्षक राहुल जोशी यांचे छायाचित्र घेऊनच सहभागी झाली होती.

जॉर्जिया येथे झालेल्या महिलांच्या तिसऱ्या विश्वचषकात दिव्याने अंतिम फेरीतील टायब्रेकरमध्ये भारताच्याच अनुभवी ३८ वर्षीय कोनेरू हम्पीला १.५-०.५ असे पराभूत केले. दिव्या ही ग्रँडमास्टर नॉर्म मिळवणारी चौथी भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. तर एकंदर भारताच्या ८८व्या खेळाडूने हा किताब मिळवला. तसेच दिव्याने सर्वात तरुण विश्वविजेती ठरण्याचाही पराक्रम केला. दिव्याला सोमवारी मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार) आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षांद्वारे झळाळता चषक देण्यात आला. तसेच ती ४२ लाखांच्या पारितोषिकाचीही मानकरी ठरली.

“मी विश्वचषक विजयाद्वारे ग्रँडमास्टर नॉर्म मिळवावा, हे कदाचित विधिलिखित असावे. हे यश मी तमाम देशवासियांना किंबहुना महिलांना समर्पित करते,” असे दिव्या म्हणाली होती. भारताचे राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा दिव्याचे कौतुक केले.

त्यानंतर फिडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिव्याने विश्वचषकाच्या दरम्यान तसेच स्पर्धेच्या तयारीसाठी तिला कोणी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले, याचा उलगडा केला. “हंगेरीच्या साबा बलोघ यांनी मला विश्वचषकासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. माझ्यासाठी ते अनेक रात्र जागून असायचे. प्रतिस्पर्धी कोणती चाल रचणार, याचा अचूक आ‌ढावा कसा बांधायचा, हे त्यांनी मला शिकवले,” असे दिव्या म्हणाली. बलोघ यांनी २००४मध्ये ग्रँडमास्टर हा नॉर्म मिळवला, तसेच २०१४ मध्ये चेस ऑलिम्पियाड विजेत्या हंगेरी संघाचे सदस्य होते.

त्याशिवाय मुंबईचा २५ वर्षीय बुद्धिबळपटू अभिमन्यू पुराणिक हासुद्धा दिव्याच्या सहाय्यक चमूत होता. “अभिमन्यू पुराणिकने या स्पर्धेसाठी मला फार सहाय्य केले. तो प्रत्येक वेळी माझे मनोबल उंचावण्यासाठी होता,” असे दिव्या म्हणाली. त्यानंतर पीटीआयला नागपूरमध्ये दिलेल्या मुलाखतीत दिव्याने राहुल जोशी यांचा उल्लेख केला. राहुल यांचे वयाच्या ४०व्या वर्षीच काही वर्षांपूर्वी निधन झाले. दिव्याने ग्रँडमास्टर व्हावे, हे त्यांचे स्वप्न होते. तेच दिव्याचे पहिले प्रशिक्षक होते. त्यामुळे दिव्याने विजयी मिरवणुकीतसुद्धा त्यांची आठवण कायम राखली.

दिव्या आणि हम्पी यांनी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यासह कँडिडेट्स स्पर्धेची पात्रतासुद्धा मिळवली आहे. हीसुद्धा एक अभिमानास्पद बाब आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांमध्येही जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत खेळवण्यात येते. यामध्ये गेल्या स्पर्धेचा विजेता थेट पात्र ठरतो, तर त्याचा प्रतिस्पर्धी कोण असणार, हे कँडिडेट्सद्वारे ठरते.

logo
marathi.freepressjournal.in