
बटुमी (जॉर्जिया) : नागपूरच्या दिव्या देशमुखने सोमवारी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी बुद्धिबळातील नवी राणी ठरण्याचा मान मिळवला. जॉर्जिया येथे झालेल्या महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत दिव्याने भारताच्याच कोनेरू हम्पीवर अंतिम फेरीत टायब्रेकरमध्ये मात केली. याबरोबरच दिव्याने सर्वात युवा विश्वविजेती ठरण्याची किमया साधली. त्यामुळे दिव्याच्या या कामगिरीची अवघ्या विश्वाने दखल घेतली असून तिच्यावर चोहीकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
२०२१पासून महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषकाला प्रारंभ झाला. यापूर्वी फक्त पुरुषांसाठीच विश्वचषक खेळवण्यात यायचा. यापूर्वी २०२१ व २०२३ मध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषकात भारताची एकही खेळाडू उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचली नव्हती. त्यातही दिव्या तर प्रथमच विश्वचषकात सहभागी झाली होती. ग्रँडमास्टर हा ‘नॉर्म’ मिळवण्यासाठी दिव्याला या स्पर्धेत छाप पाडणे गरजेचे होते. फिडे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघातर्फे आयोजित जागतिक पातळीवरील स्पर्धांमध्ये अपेक्षित गुण कमावण्यासह मानांकित खेळाडूंना पराभूत केले, तरच ‘ग्रँडमास्टर’ हा नॉर्म मिळतो. दिव्याने या स्पर्धेत तिच्यापेक्षा जागतिक क्रमवारीत वरच्या स्थानी असलेल्या खेळाडूंना नमवण्याचा पराक्रम केला. त्यामुळेच ती ग्रँडमास्टर हा किताब मिळवणारी भारताची एकंदर चौथी महिला ठरली. यापूर्वी हम्पी, द्रोणावल्ली हरिका व आर. वैशाली यांनी अशी कामगिरी नोंदवली होती. मुख्य म्हणजे हम्पीने २००२मध्ये जेव्हा ग्रँडमास्टर हा नॉर्म मिळवला, तेव्हा दिव्याचा जन्मही झाला नव्हता. २००५मध्ये जन्मलेल्या दिव्याने कनिष्ठ गटात जागतिक स्पर्धा जिंकली. तेथून तिने मागे वळून पाहिले नाही.
दिव्या आणि हम्पी यांनी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यासह कँडिडेट्स स्पर्धेची पात्रतासुद्धा मिळवली आहे. हीसुद्धा एक अभिमानास्पद बाब आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांमध्येही जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत खेळवण्यात येते. यामध्ये गेल्या स्पर्धेचा विजेता थेट पात्र ठरतो, तर त्याचा प्रतिस्पर्धी कोण असणार, हे कँडिडेट्स स्पर्धेद्वारे ठरते. कँडिडेट्समध्ये एकूण ८ खेळाडू असतील. त्यापैकी दोन भारताच्या असतील. पुढील वर्षी एप्रिलमध्ये कँडिडेट्स स्पर्धा होणार असून ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात जागतिक लढत होईल. चीनच्या जू वेन्जूनने मागील जागतिक लढत जिंकली. त्यामुळे तिच्याविरुद्ध आता कँडिडेट्स स्पर्धेतील विजेती उभी ठाकेल.
“मला या क्षणातून सावरण्यासाठी काही वेळ लागेल. स्पर्धेपूर्वी माझ्याकडे ग्रँडमास्टर हा नॉर्म नव्हता. मात्र विश्वचषक विजयासह मी कँडिडेट्स स्पर्धेची पात्रता मिळवेन तसेच ग्रँडमास्टर नॉर्म मिळवेन, हे कदाचित विधीलिखित होते,” असे दिव्या म्हणाली.
“माझ्या कारकीर्दीची आता कुठे सुरुवात झाली आहे. देशासाठी बुद्धिबळ खेळात अधिकाधिक पदके व चषक जिंकण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असेन. या कामगिरीद्वारे देशभरातील मुलींना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याची प्रेरणा मिळावी, हा माझा हेतू आहे. माझ्या आई-वडीलांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. तसेच प्रशिक्षकांचेही यामध्ये मोलाचे योगदान आहे,” असेही दिव्याने सांगितले.
दिव्याच्या रूपात आता बुद्धिबळाच्या पटलावर आणखी एका ताऱ्याचा उदय झाला आहे. त्यामुळे दिव्याकडून भविष्यातही आणखी चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूर बुद्धिबळ असोसिएशनचे एस. सोमण यांनी दिव्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दिव्याच्या कारकीर्दीचा आढावा
नागपूरमध्ये जन्मलेल्या दिव्याचे आई-वडील हे दोघेही डॉक्टर आहेत. आई नम्रता ही दिव्यासोबत प्रामुख्याने सर्व स्पर्धांसाठी जाते. विश्वचषक विजयानंतर दिव्याने सर्वप्रथम धावत येऊन आईलाच आलिंगन दिले. हा क्षण भावनिक होता.
शालेय वयापासूनच बुद्धिबळाची आवड निर्माण झाल्यावर दिव्याने जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये उत्तम यश मिळवले. मग कनिष्ठ वयोगटातील स्पर्धांमध्येही तिने छाप पाडली.
२०२१मध्ये दिव्याने महिला ग्रँडमास्टर हा नॉर्म मिळवला. २०२२च्या चेस ऑलिम्पियाडमध्ये तिने कांस्यपदकही जिंकले. त्याच वर्षी तिने राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.
२०२०मध्ये झालेल्या ऑनलाइन ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने जेतेपद मिळवले. त्यावेळी
दिव्या त्या संघाचा भाग होती. मग २०२३मध्ये दिव्याने आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टरचा नॉर्म मिळवला.
२०२४मध्ये भारताने ऑलिम्पियाडमध्ये दुहेरी सुवर्ण जिंकले. त्यावेळी महिला संघाच्या विजयात दिव्याचे मोलाचे योगदान होते. त्याच वर्षी तिने २० वर्षांखालील जागतिक स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला. त्यामुळे दिव्याचे नाव जगभरात उज्ज्वल झाले.
दिव्याकडे तीन जागतिक स्पर्धा जिंकण्याची क्षमता
दिव्याने अवघ्या कमी वयात दाखवलेली प्रगल्भता फारच वाखाणण्याजोगी आहे. विश्वचषक विजय ही फक्त सुरुवात आहे. तिच्याकडे पुढील ५ वर्षांत ३ जागतिक स्पर्धाही जिंकण्याची क्षमता आहे. १०७ खेळाडूंसह यंदाच्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. दिव्याला या स्पर्धेसाठी १५वे मानांकन होते. तर अंतिम फेरीतील अन्य भारतीय स्पर्धक हम्पी चौथी मानांकित होती. दिव्याने पहिल्या १-२ फेऱ्यांमध्ये सहज विजय मिळवला. मात्र चौथ्या फेरीत तिच्यासमोर चीनच्या दुसऱ्या मानांकित झू जायनरचे आव्हान होते. दिव्याने तिला नमवून सर्वांनाच धक्का दिला. त्यावेळी दिव्याही वेगळ्याच दर्जाचे बुद्धिबळ खेळत असल्याचे दिसून आले. मग उपांत्यपूर्व फेरीत तिने भारताच्या हरिकावर सहज मात केली. उपांत्य फेरीत दिव्यासमोर मग पुन्हा एकदा चीनची खेळाडू आली. तिसऱ्या मानांकित टॅन झोंगाईला दिव्या नमवू शकते, याचा मीसुद्धा विचार केला नव्हता. कारण टॅन ही खरंच मातब्बर खेळाडू आहे. तिने जागतिक विजेतेपद मिळवलेले असून कँडिडेट्स स्पर्धाही जिंकलेली आहे. दुसरीकडे हम्पीनेसुद्धा उपांत्य फेरीत अग्रमानांकित चीनच्याच ले टिंगेईला धूळ चारली. त्यामुळे सुदैवाने आपल्या दोघी खेळाडू प्रथमच अंतिम फेरीत पोहोचल्या. अंतिम फेरीत हम्पीचे पारडे जड असल्याचे मला वाटत होते. कारण तिच्याकडे इतक्या वर्षांचा अनुभव असून ती कँडिडेट्स स्पर्धाही खेळलेली आहे. मात्र दिव्याने तिच्या देहबोलीवरून एकप्रकारे हम्पीला दबावात आणले. दिव्या भराभर चाल खेळते, तर हम्पी काहीसा विचार करून खेळते. पहिला डाव बरोबरीत सुटल्यावर, हम्पीला संधी होती. मात्र दिव्याने तिकडे उत्तम बचाव केला. टायब्रेकरमध्येही मग दिव्याने संयम बाळगून हम्पीला चूका करण्यास भाग पाडले. मुख्य म्हणजे दिव्याकडे प्रत्येक चालीसाठी पुरेसा वेळ होता. कदाचित याचे हम्पीवर दडपण आले असावे. अखेरीस टायब्रेकरमध्ये हम्पी मागे पडली. तिने पुढील डावाचा विचार केला, तर दिव्याने मात्र सध्या सुरू असलेल्या डावावर लक्ष केंद्रित केले. जणू तिला अर्जुनाप्रमाणे फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता. त्यामुळे पुढील डावात काय होईल, याचा विचार न करता दिव्याने जे डोळ्यांसमोर सुरू आहे, त्यावर लक्ष देत सामना जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. याचेच फलित म्हणूल हम्पीने हार मानली व दिव्याने बाजी मारली. हम्पी मानसिकदृष्ट्या कणखर असली, तरी दिव्याचा आत्मविश्वास व सकारात्मक देहबोलीपुढे ती काहीशी डगमगताना दिसली. त्यामुळे दिव्या कँडिडेट्स स्पर्धेतही बाजी मारून जगज्जेतीला आव्हान देईल, अशी आशा आहे. २०२६, २०२८ व २०३० या जागतिक स्पर्धांमध्ये दिव्यावर नक्कीच अवघ्या भारताचे लक्ष असेल.
प्रवीण ठिपसे, ग्रँडमास्टर आणि प्रशिक्षक
महाराष्ट्राचे बुद्धिबळातील वर्चस्व अधोरेखित
महाराष्ट्रासह अवघ्या भारत देशासाठी आजचा दिवस संस्मरणीय आहे. दिव्याने वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी विश्वविजेती ठरण्याचा पराक्रम केला. या स्पर्धेत तिने चार मोठ्या खेळाडूंना धूळ चारण्याचा पराक्रम केला. हे खरंच कौतुकास्पद आहे. दिव्याच्या या दिव्य कामगिरीमुळे एकप्रकारे भारताचे बुद्धिबळातील वर्चस्व अधोरेखित होते. २०२४ हे वर्ष भारतीय बुद्धिबळाचे कायापालट करणारे वर्ष ठरले होते. वर्षाच्या सुरुवातीला दिव्याने कनिष्ठ गटाचे जागतिक जेतेपद मिळवले. त्यानंतर पुरुषांच्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी आपले ३ खेळाडू पात्र ठरले. त्यातून मग गुकेशने जागतिक लढतीची पात्रता मिळवली. सप्टेंबरमध्ये दुहेरी चेस ऑलिम्पियाड सुवर्णपदक पटकावून आपली ताकद संपूर्ण विश्वाला दाखवून दिली. मग डिसेंबरमध्ये गुकेशने १४ फेऱ्यांच्या कडव्या संघर्षानंतर लिरेनला चीतपट केले. त्यामुळे भारताचे बुद्धिबळातील वर्तमान व भविष्य फार उज्ज्वल असल्याची खात्री पटली. आता २०२५मध्येही आपण बुद्धिबळातील वर्चस्व कायम राखले आहे. त्यामुळे पुढील १० वर्षे भारताचे विविध तारे बुद्धिबळाच्या अंतराळात असेच चमकत राहतील.
अभिजीत कुंटे, ग्रँडमास्टर आणि प्रशिक्षक