बाटुमी (जॉर्जिया) : नागपूरच्या अवघ्या १९ वर्षांच्या दिव्या देशमुख हिने बुद्धिबळाच्या पटावर ऐतिहासिक कामगिरी करत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारताच्याच कोनेरू हम्पी हिला टायब्रेकरमध्ये हरवत दिव्या देशमुख हिने महिला विश्वचषकाला गवसणी घातली. याचबरोबर दिव्या हिने भारताची ८८वी ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला. दिव्याच्या या अभूतपूर्व कामगिरीवर फक्त राज्यातूनच नव्हे तर देशभरातूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अंतिम फेरीतील दोन्ही क्लासिकल डाव बरोबरीत सुटल्यानंतर दिव्याने टायब्रेकरद्वारे जगज्जेतेपदाचा निकाल आपल्या बाजूने झुकवला. सोमवारी खेळल्या गेलेल्या रॅपिड राऊंडमध्ये जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिने पहिल्या गेममध्ये पांढऱ्या सोंगट्यांसह सुरुवात केली. आक्रमक खेळ करत तिने जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानी असलेल्या कोनेरू हम्पीशी बरोबरी साधली. जलद प्रकाराच्या दुसऱ्या डावात काळ्या मोहऱ्यांसह खेळताना दिव्यावर दडपण आले होते.
हम्पी २००२ साली भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर बनली तेव्हा दिव्याचा (२००५) जन्मही झाला नव्हता. बुद्धिबळाच्या पटावरील हम्पीचा प्रदीर्घ अनुभव पाहता, तिचेच विजेतेपद निश्चित होणार, असे सर्वांना वाटत होते. मात्र, हम्पीच्या काही चुकांचा फटका तिला बसला. दिव्याने झटपट चाली रचल्या, त्याउलट हम्पीचा सुरुवातीच्या काही चाली रचण्यासाठी बराच वेळ वाया गेला, त्यामुळे दडपणाखाली आलेल्या हम्पीला हरवत दिव्याने विजेतेपदावर मोहोर उमटवली.
विजेतपद पटकावल्यानंतर दिव्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. तिने बाहेर आल्यावर आपल्या आईला घट्ट मिठी मारली. “ही स्पर्धा सुरू होण्याआधी माझ्याकडे ग्रँडमास्टर होण्यासाठीचा एकही नॉर्म नव्हता. मात्र, आता जेतेपदासह ग्रँडमास्टर झाल्याचा आनंद अवर्णनीय असाच आहे,” अशा शब्दांत दिव्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्राची पहिली महिला ग्रँडमास्टर बनण्याचा मान
जगज्जेतेपदाला गवसणी घालतानाच, एकाच स्पर्धेत ग्रँडमास्टर होण्यासाठीचे तिन्ही नॉर्म पूर्ण करत दिव्या देशमुख हिने देशाची ८८वी ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला. आता पुढील वर्षी होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणारी ती जगातील सर्वात लहान महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. दिव्या देशमुख ही महाराष्ट्राची १३वी ग्रँडमास्टर ठरली असून राज्यातून पहिली महिला ग्रँडमास्टर बनण्याचा मान तिने मिळवला. त्याचबरोबर कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका आणि आर. वैशाली यांच्यानंतरची ती देशाची चौथी महिला ग्रँडमास्टर ठरली.
दिव्याचा अभिमान वाटतोय - नरेंद्र मोदी
दोन उत्कृष्ट भारतीय बुद्धिबळपटूंचा समावेश असलेला हा ऐतिहासिक अंतिम सामना ठरला. एफआयडीई महिला विश्वचषक स्पर्धा २०२५ स्पर्धेत जेतेपद जिंकणाऱ्या दिव्या देशमुखचा अभिमान वाटतोय. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन. तिच्या या कामगिरीमुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल. शिवाय, कोनेरू हम्पी हिनेही संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. दोन्ही खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्याची स्तुती केली.
नागपूरची शान, देशाचा अभिमान - फडणवीस
कमी वयात ग्रँडमास्टर किताब आणि जागतिक अजिंक्यपद मिळवणे, ही अभिमानाची गोष्ट आहे. दिव्या ही नागपूरची शान आणि देशाचा अभिमान आहे. भारत आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचा उचित सन्मान झालाच पाहिजे. म्हणून मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांच्याशी चर्चा करून त्यांचा सन्मान कसा करायचा, हे ठरवू. खेळाडूंसाठी नवीन योजनांची आवश्यकता असेल, तर त्या योजनाही आखू.
आपले खेळाडू ज्या खेळात उत्तम खेळत आहेत, त्यांना निश्चितपणे योग्य मदत झाली पाहिजे, तसे वातावरण मिळायला पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याचे कौतुक केले.