विश्वविजेती दिव्या मायदेशी परतली; नागपूर एअरपोर्टवर जंगी स्वागत

नागपूरची १९ वर्षीय विश्वविजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचे बुधवारी भारतात आगमन झाले. मुंबई विमानतळाहून नागपूरला रवाना झाल्यावर तेथे तिच्या स्वागतासाठी चाहत्यांची गर्दी उसळली होती. यावेळी दिव्याची आईसुद्धा उपस्थित होती. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच दिव्याचा सत्कार करण्याचे जाहीर केले.
विश्वविजेती दिव्या मायदेशी परतली; नागपूर एअरपोर्टवर जंगी स्वागत
Photo : X
Published on

मुंबई : नागपूरची १९ वर्षीय विश्वविजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचे बुधवारी भारतात आगमन झाले. मुंबई विमानतळाहून नागपूरला रवाना झाल्यावर तेथे तिच्या स्वागतासाठी चाहत्यांची गर्दी उसळली होती. यावेळी दिव्याची आईसुद्धा उपस्थित होती. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच दिव्याचा सत्कार करण्याचे जाहीर केले.

जॉर्जिया येथे झालेल्या महिलांच्या तिसऱ्या विश्वचषकात दिव्याने अंतिम फेरीतील टायब्रेकरमध्ये भारताच्याच अनुभवी ३८ वर्षीय कोनेरू हम्पीला १.५-०.५ असे पराभूत केले. दिव्या ही ग्रँडमास्टर नॉर्म मिळवणारी चौथी भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. तर एकंदर भारताच्या ८८व्या खेळाडूने हा किताब मिळवला. तसेच दिव्याने सर्वात तरुण विश्वविजेती ठरण्याचाही पराक्रम केला. दिव्याला सोमवारी मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार) आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षांद्वारे झळाळता चषक देण्यात आला. तसेच ती ४२ लाखांच्या पारितोषिकाचीही मानकरी ठरली.

“मी विश्वचषक विजयाद्वारे ग्रँडमास्टर नॉर्म मिळवावा, हे कदाचित विधिलिखित असावे. हे यश मी तमाम देशवासियांना किंबहुना महिलांना समर्पित करते,” असे दिव्या म्हणाली होती. भारताचे राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा दिव्याचे कौतुक केले.

दिव्या आणि हम्पी यांनी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यासह कँडिडेट्स स्पर्धेची पात्रतासुद्धा मिळवली आहे. हीसुद्धा एक अभिमानास्पद बाब आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांमध्येही जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत खेळवण्यात येते. यामध्ये गेल्या स्पर्धेचा विजेता थेट पात्र ठरतो, तर त्याचा प्रतिस्पर्धी कोण असणार, हे कँडिडेट्स स्पर्धेद्वारे ठरते. कँडिडेट्समध्ये एकूण ८ खेळाडू असतील. त्यापैकी दोन भारताच्या असतील. पुढील वर्षी एप्रिलमध्ये कँडिडेट्स स्पर्धा होणार असून ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात जागतिक लढत होईल.

एकंदर दिव्याच्या यशामुळे सध्या भारतात बुद्धिबळाची क्रेझ वाढली असून यामुळे खेळाला चांगले दिवस आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in