मेलबर्न : सर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासह स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररची बरोबरी साधली. फेडररने कारकीर्दीत ५८वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता जोकोव्हिचही त्याच्या बरोबरच आहे.
पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील लढतीत जोकोव्हिचने ॲड्रीएन मॅनारिनोला ६-०, ६-०, ६-३ अशी धूळ चारली. स्टेफानोस त्सित्सिपासचे मात्र आव्हान संपुष्टात आले. १२व्या मानांकित टेलर फ्रिट्झने त्सित्सिपासला ७-६ (७-३), ५-७, ६-३, ६-३ असे नमवले. याव्यतिरिक्त, चौथा मानांकित जॅनिक सिनर व पाचवा मानांकित आंद्रे रुब्लेव्ह यांनी आगेकूच केली.