
पॅरिस : सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि इटलीचा जॅनिक सिनर यांनी गुरुवारी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. जोकोव्हिचने अलेक्झांडर झ्वेरेव्हचे आव्हान संपुष्टात आणले. आता शुक्रवारी उपांत्य फेरीचा थरार रंगणार असून अन्य लढतीत गतविजेता कार्लोस अल्कराझ व लॉरेंझो मुसेट्टी आमनेसामने येतील. तर जोकोव्हिचची अग्रमानांकित सिनरशी गाठ पडणार आहे.
चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक मानल्या जाणारी फ्रेंच ओपन ही स्पर्धा लाल मातीवर (क्ले कोर्ट) खेळवण्यात येते. यंदा या स्पर्धेचे १२४वे पर्व सुरू असून राफेल नदाल, रॉजर फेडरर, अँडी मरे आणि जोकोव्हिच या टेनिसमधील ‘फॅब फोर’चा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गौरव करण्यात आला. नदाल, मरे व फेडरर आता टेनिसमधून निवृत्त झाले आहेत, तर ३८ वर्षीय जोकोव्हिच मात्र अद्यापही २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या शोधात खेळत आहे.
दरम्यान, महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत गतविजेत्या स्विआटेकने १३व्या मानांकित एलिना स्विटोलिनाला ६-१, ७-५ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. तसेच अग्रमानांकित सबालेंकाने चीनच्या आठव्या मानांकित क्विनवेन झेंगला ७-६ (७-३), ६-३ असे नमवले. आता याच दोघींमध्ये उपांत्य लढत रंगणार आहे.
पुरुष एकेरीत अग्रमानांकित सिनरने आंद्रे रुब्लेव्हला ६-१, ६-३, ६-४ अशी धूळ चारली. सहाव्या मानांकित जोकोव्हिचने कॅमेरून नोरीला ६-२, ६-३, ६-२ असे नेस्तनाबूत केले. तिसऱ्या मानांकित झ्वेरेव्हने ग्रिसकोपरवर ६-४, ३-० अशी आघाडी मिळवलेली असताना ग्रिसकोपरने दुखापतीमुळे माघार घेतली. त्याशिवाय स्पेनचा गतविजेता कार्लोस अल्कराझनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश पक्का केला आहे. त्यामुळे जोकोव्हिच, सिनर, अल्कराझ व झ्वेरेव्ह यांच्यापैकी कोण पुरुषांमध्ये बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल. महिलांमध्ये स्विआटेक व सबालेंका यांच्यापैकी एक विजेती ठरू शकते.