श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आज ‘करो या मरो’

श्रीलंकेविरुद्धचा सामना गमावल्यास भारतावर स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आज ‘करो या मरो’
Published on

आशिया चषक स्पर्धेत ‘सुपर-४’मध्ये मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतापुढे ‘करो या मरो’ अशी स्थिती निर्माण झाली असून स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारताला विजय अत्यावश्यक आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फलंदाजांना लगाम घालण्यात अपयश आल्याने भारताला गोलंदाजी सुधारण्यावर भर द्यावा लागणार आहे.

श्रीलंकेविरुद्धचा सामना गमावल्यास भारतावर स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे. दुखपतग्रस्त रवींद्र जडेजा, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत भारताकडे गोलंदाजीसाठी जास्त पर्याय राहिलेले नाहीत. भारताने रविवारी पाकिस्तानविरुद्ध पाच गोलंदाज मैदात उतरवविले होते; परंतु त्यांना विशेष काही करता आले. फलंदाजांना लगाम घालण्यात त्यांना अपयश आले. मंगळवारच्या महत्त्वपूर्ण सामन्यात गोलंदाजांना आपल्या लयीत परतावे लागेल. पाकिस्तानविरुद्धच्या सुरुवातीच्या सामन्यात विजयात मोलाची भूमिका बजावणारा हार्दिक पंड्या महागडा गोलंदाज ठरला. युझवेंद्र चहलला हादेखील सर्वश्रेष्ठ फॉर्म दाखविण्यात अपयशी ठरला. संघात समतोल साधण्यासाठी अक्षर पटेलला अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाच्या जागेवर अक्षरची निवड करण्यात आली आहे. आवेश खान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या आधीपासून आजारी होता. त्याला हलकासा ताप आला होता. वेगवान गोलंदाज म्हणून त्याचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारत टी-२० विश्वचषकाच्या आदीपासूनच आपल्या सर्वश्रेष्ठ अंतिम ११ खेळाडूंना घेऊन खेळण्यास सुरुवात करील, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले होते. त्यातच आता दिनेश कार्तिक की ऋषभ पंत, अशी चर्चा सुरू झाली आहे. भारताची गोलंदाजी कमजोर ठरत असतानाच फलंदाजीत एकट्या विराट कोहलीनेच आशा पल्लवित ठेवल्या आहेत. मधल्या फळीतील फलंदाजांना आपल्या तंत्रकौशल्यात सुधारणा करावी लागेल. पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात वरच्या फळीतील फलंदाजांनी पऱ्यापैकी कामगिरी केली होती. रोहित, के एल राहुल आणि विराट कोहली यांनी अपेक्षित आक्रमकता दाखविली.

भारताला आश्वासक सुरुवात दिली. कोहलीच्या दोन अर्धशतकांमुळे त्याच्या टीकाकारांची तोंडे आपसूकच बंद झालेली असली, त्यांच्या तोंडातून स्तुती करणारे भाष्य निघण्याइतपत चमकदार खेळी कोहलीकडून अपेक्षित आहे. श्रीलंकेने लागाेपाठ दोन सामने धावांचा पाठलाग करून जिंकले. सुरुवातीच्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्ध दोन विजय मिळविल्यानंतर श्रीलंकेने आपल्या विजयाची गाडी रुळावर आणली. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज चरित असालंका वगळता श्रीलंकेच्या फलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली आहे.

बांगलादेशविरुद्ध कर्णधार दासुन शनाका आणि कुसल मेंडिस यांनी; तर अफगाणिस्तानविरुद्ध धनुष्का गुणतिलका आणि भानुका राजपक्षे यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. श्रीलंकेचे प्रशिक्षक क्रिस सिल्वरवुड यांना कोणत्याही परिस्थितीत त्यांचा संघ विजयश्री खेचून आणू शकतो, याची खात्री वाटत आहे. त्यामुळे भारताला सावधपूर्वक पावले टाकावी लागतील. कारण एक पराभव भारताला स्पर्धेबाहेर ढकलू शकतो. कर्णधार शनाकाने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर सांगितले होते की, ‘‘आता श्रीलंकेचा संघ कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करण्यास सक्षम असल्यानची भावना ड्रेसिंग रूममध्ये प्रत्ययास येत आहे. खेळपट्टीचा वेध घेण्यास सारेच खेळाडू सक्षम झाले आहेत.’’

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.

श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), दानुष्का गुणतिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानिंडू हसरंगा, महेश तीक्ष्णा, जेफरी वांडरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, मसीथा पथिराना, असिता फर्नांडो, दुष्मंथा चमीरा, दिनेश चांदीमल.

सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० पासून नाणेफेक : ७.०० वाजता.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डीडी स्पोर्ट्स, डिज्नी प्लस हॉटस्टार

logo
marathi.freepressjournal.in