डायमंड लीगमध्ये आज नीरज चोप्रा, किशोर जेनाकडे लक्ष; ऑलिम्पिकच्या दृष्टीने कामगिरीवर राहणार भारतीयांची नजर

भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि किशोर जेना शुक्रवारी डायमंड लीगच्या पहिल्या टप्प्यात सुवर्णपदकासाठी दावेदारी पेश करतील.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

दोहा : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि किशोर जेना शुक्रवारी डायमंड लीगच्या पहिल्या टप्प्यात सुवर्णपदकासाठी दावेदारी पेश करतील. आगामी पॅरिस ऑलिम्पिकच्या दृष्टीने दोघांच्या कामगिरीकडे भारतीयांचे लक्ष असेल.

२६ वर्षीय नीरजने २०२२मध्ये डायमंड लीग जिंकण्याचा पराक्रम केला होता. आता दोहा येथे शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यात नीरजसह किशोरकडून भारताला अपेक्षा आहेत. या दोघांनी आशियाई स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्य प्राप्त केले होते. नीरजला या स्पर्धेत किशोरव्यतिरिक्त ग्रेनाडाचा आंद्रे पीटर्स आणि चेक प्रजासत्ताकचा जेकब वॅडेल्च यांचेही कडवे आव्हान असेल. किशोर यंदा प्रथमच डायमंड लीगमध्ये सहभागी होत आहे. नीरजने आतापर्यंत ८९.९४ मीटर अंतरावर भालाफेक केलेली आहे. तर किशोरची सर्वोत्तम कामगिरी ८७.५४ मीटर इतकी आहे. यंदा नीरजने ९० मीटरचे लक्ष्य गाठण्याचे ठरवले आहे.

डायमंड लीगच्या पहिल्या टप्प्यानंतर नीरज भारतात परतणार आहे. १२ ते १५ मे दरम्यान भुवनेश्वर येथे फेडरेशन चषक राष्ट्रीय स्पर्धा होणार असून या स्पर्धेत नीरज ३ वर्षांनी खेळणार आहे. २०२१मध्ये नीरजने या स्पर्धेत ८७.७० मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. १९ मे रोजी मोरोक्को येथे डायमंड लीगचा दुसरा टप्पा रंगणार आहे. २६ जुलैपासून ऑलिम्पिकला प्रारंभ होणार असून नीरज आणि किशोर यांच्याकडून नक्कीच भारताला पदक अपेक्षित आहे. त्यादृष्टीने आता हंगामाची सुरुवात दणक्यात होणे गरजेचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in