बुमराषष्टी! यशस्वी जैस्वालचे द्विशतक; जसप्रीतच्या स्विंग गोलंदाजीसमोर इंग्लंड निष्प्रभ

दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस सुरू झाला तो यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाने. कारकीर्दीतील सहावा कसोटी सामना खेळणाऱ्या २२ वर्षीय यशस्वीने २९० चेंडूंत २०९ धावांची खेळी करत भारताला पहिल्या डावात सर्वबाद ३९६ धावांची मजल मारून दिली.
बुमराषष्टी! यशस्वी जैस्वालचे द्विशतक; जसप्रीतच्या स्विंग गोलंदाजीसमोर इंग्लंड निष्प्रभ

विशाखापट्टणम : मुंबईकर यशस्वी जैस्वालच्या द्विशतकी खेळीनंतर विशाखापट्टणमच्या डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर जसप्रीत बुमराचे वादळ घोंघावले. बुमराच्या स्विंग गोलंदाजीसमोर पाहुण्या इंग्लंड संघाच्या फलंदाजांची पळताभुई थोडी झाली. बुमराने घेतलेल्या सहा विकेट्सच्या जोरावर भारताने इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर संपुष्टात आणत १४३ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद २८ धावा करत भारताने १७१ धावांनी आगेकूच केली आहे.

दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस सुरू झाला तो यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाने. कारकीर्दीतील सहावा कसोटी सामना खेळणाऱ्या २२ वर्षीय यशस्वीने २९० चेंडूंत २०९ धावांची खेळी करत भारताला पहिल्या डावात सर्वबाद ३९६ धावांची मजल मारून दिली. कसोटीत सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारा तो विनोद कांबळी आणि सुनील गावस्कर यांच्यानंतरचा तिसरा सर्वात युवा फलंदाज ठरला. विनोद कांबळीने १९९३मध्ये वयाच्या २१व्या वर्षी आणि ३३५व्या दिवशी इंग्लंडविरुद्ध द्विशतक साजरे केले होते. गावस्कर यांनी १९७१मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ही किमया साकारली होती. यशस्वी जैस्वाल हा घरच्या मैदानावर कसोटीत द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण सलामीवीर फलंदाज ठरला आहे. त्याने २२ वर्षे ३७ दिवसांत ही कामगिरी केली.

गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीतही यशस्वीने १७१ धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या याआधीच्या पहिल्या कसोटीत त्याने ८० धावा फटकावल्या होत्या, मात्र भारताला या सामन्यात २८ धावांनी पराभव पत्करावा लागला. कालच्या धावसंख्येवरून खेळताना, यशस्वीने रविचंद्रन अश्विनसोबत आणखी २८ धावांची भर घातली. त्यानंतर वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने अश्विनला (२०) माघारी पाठवले. त्यानंतर यशस्वीने युवा फिरकीपटू शोएब बशीरला षटकार आणि चौकार ठोकत आपल्या कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या द्विशतकाला गवसणी घातली. त्यानंतर अँडरसनला मोठा फटका मारण्याच्या नादात उडालेला झेल जॉनी बेअरस्टोने टिपला. त्यामुळे यशस्वीची खेळी २९० चेंडूंत १९ चौकार आणि ७ षटकारांसह २०९ धावांवर संपुष्टात आली. इंग्लंडकडून अँडरसन, बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. भारताच्या पहिल्या डावातील ३९६ धावांना प्रत्युत्तर देताना झॅक क्रावली आणि बेन डकेट यांनी इंग्लंडला ५९ धावांची सलामी देत चांगली सुरुवात करून दिली. फिरकीपटू कुलदीप यादवने डकेटला (२१) रजत पाटिदारकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर क्रावली आणि ऑली पोप यांनी इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भर घातली. मात्र अक्षर पटेलने क्रावलीला बाद केल्यानंतर इंग्लंडच्या डावाला घरघर लागली. क्रावलीने ७८ चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांसह ७६ धावा फटकावल्या. त्यानंतर बुमराच्या भेदक स्पेलसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. त्याची पहिली शिकार ठरला तो जो रूट. बुमराने शुभमन गिलकरवी रूटला (५) झेलबाद केले. त्यानंतरच्या एका चेंडूवर बुमराने ऑली पोपचा त्रिफळा उडवला. बुमराचा हा रिव्हर्सिंग यॉर्कर म्हणजे जणू आगीचा गोळा होता. त्या चेंडूला ऑली पोपसमोर कोणतेही उत्तर नव्हते. तिसऱ्या सत्रात बुमराने जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, टॉम हार्टले आणि जेम्स अँडरसन यांचे विकेट मिळवले. बेअरस्टो आणि स्टोक्स ही जोडी मैदानावर जमली असे वाटत असतानाच, बुमराने बेअरस्टोला (२५) गिलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर बेन फोक्स (६) आणि रेहान अहमद यांनी फक्त मैदानावर हजेरी लावण्याचे काम केले. या दोघांनाही कुलदीप यादवने बाद केले. हार्टले आणि स्टोक्स यांनी आठव्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी रचल्यानंतर बुमराने स्टोक्सचा (४७) त्रिफळा उद्ध्वस्त केला. त्यापाठोपाठ हार्टले (२१) आणि अँडरसन (६) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत बुमराने कारकीर्दीतील १५० बळींचा टप्पा पार केला. बुमराच्या ६ विकेट्सच्या जोरावर भारताने इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर संपवला. कुलदीप यादवने तीन तर अक्षर पटेलने एक बळी मिळवत बुमराला चांगली साथ दिली.

यशस्वी जैस्वालने शनिवारी कारकीर्दीतील पहिलेवहिले द्विशतक झळकावल्यानंतर त्याच्यावर क्रिकेटजगतातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘यशस्वी भव:’ अशा शब्दांत त्याचे कौतुक केले आहे. आपल्या सहाव्या कसोटी सामन्यात २२ वर्षीय यशस्वीने द्विशतकाला गवसणी घातली. त्याच्या एकहाती खेळीमुळे भारताला ३९६ धावांपर्यंत मजल मारता आली.

‘वेल डन यशस्वी. सुपर कामगिरी’ अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने त्याला कौतुकाची थाप दिली. भारताचा फलंदाज विराट कोहली म्हणाला की, “यशस्वी जैस्वालची तुफान कामगिरी. या वयात अशी खेळी मी पाहिलेली नाही.” इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन म्हणाला की,“जागतिक खेळामधील सर्वोत्तम कथानकांपैकी जैस्वालची खेळी असेल. एका उभरत्या खेळाडूकडून ही दमदार सुरुवात म्हणावी लागेल.” भारताचा माजी वेगवान गोलंदाज रुद्रप्रताप सिंग यानेही यशस्वीची स्तुती केली. तो म्हणाला की, “युवा यशस्वी जैस्वालकडून एका दमदार द्विशतकी खेळीबद्दल त्याचे अभिनंदन.” “यशस्वीचे शतक स्पेशल होते. त्यानंतर त्याने झळकावलेले द्विशतक हे त्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले. नावाप्रमाणेच यशस्वी होत जा. तुझ्याकडून आणखीन अशाच खेळीची अपेक्षा राहील. वेल डन यशस्वी जैस्वाल,” अशा शब्दांत भारतीय महिला संघाची माजी कर्णधार अंजूम चोप्रा हिने यशस्वीवर कौतुकाचा वर्षाव केला.

मी केलेल्या कामगिरीच्या आकड्यांवर नजर न टाकण्याचा प्रयत्न करत होतो. आपणच आपल्यावर दडपण टाकण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्या गोष्टीचा आनंद घेता येत नाही. जर मी विक्रमी कामगिरीवर नजर टाकत गेलो असलो तर कदाचित मला इतकी चांगली कामगिरी करता आली नसती. कसोटी खेळण्याची माझी तीव्र इच्छा आहे, हे तुम्हाला माहीत आहेच. त्यामुळे या कामगिरीवर मी बेहद खूश आहे. रिव्हर्स स्विंगने गोलंदाजी करत जातो, तेव्हा तुमच्याकडून जादुई चेंडू टाकले जातात. एकदा का त्या जादुई चेंडूंची सवय लागली तर आणखीन भेदक असे जादुई चेंडू तुमच्या भात्यातून पडत जातात. मात्र असे करताना तुम्हाला संयमही बाळगावा लागतो. मी एका रणनीतीनुसार गोलंदाजी करत गेलो, त्यामुळे मला इंग्लंडविरुद्ध यश मिळाले. - जसप्रीत बुमरा

बुमराचे १५० बळी

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने शनिवारी कसोटी कारकीर्दीत वेगवान १५० बळी मिळवण्याची करामत केली. अवघ्या ३४ कसोटींत त्याने १५० बळी आपल्या नावावर केले. याआधी भारताकडून हा विक्रम वेगवान गोलंदाज कपिल देव (३९ सामन्यांत १५० बळी) यांच्या नावावर होता. जगात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकास युनिस याने २७ कसोटींत ही किमया केली आहे. भारताकडून फिरकीपटूंमध्ये ईरापल्ली प्रसन्ना आणि अनिल कुंबळे यांनीही ३४ कसोटींत हे शिखर गाठले आहे. बुमराच्या आधी रविचंद्रन अश्विन याने २९ कसोटींत, तर रवींद्र जडेजाने ३२ कसोटींत १५० विकेट्स मिळवण्याची करामत केली आहे.

'सचिन-सेहवागच्या यादीत' जैस्वाल सामील

आतापर्यंत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये एकूण २४ खेळाडूंनी द्विशतके झळकावली आहेत. त्यात अनुभवी वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा या खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. आता जैस्वाल कसोटीत द्विशतक झळकावणारा भारताचा २५वा खेळाडू ठरला आहे.

२०९

यशस्वी जैस्वाल

२९० चेंडू

१९ चौकार

७ षटकार

जसप्रीत बुमरा

१५.५-५-४५-६

logo
marathi.freepressjournal.in