

न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू डग ब्रेसवेलने सर्व क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले. ३५ वर्षीय ब्रेसवेल गेल्या काही काळापासून बरगडीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या अधिकृत हँडलने सोशल मीडियावर ब्रेसवेलच्या निवृत्तीची बातमी जाहीर केली. ब्रेसवेलने न्यूझीलंडला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या होबार्ट कसोटीतील त्याच्या दमदार कामगिरीमुळे न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला.
डग ब्रेसवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
न्यूझीलंड संघाचे अधिकृत सोशल मीडिया हँडल ब्लॅककॅप्सने एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिले की, "ऑलराउंडर डग ब्रेसवेलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ब्रेसवेलने न्यूझीलंडसाठी २८ कसोटी, २१ एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळले आहेत. त्याने १२० विकेट्स आणि ९१५ धावा केल्या आहेत. २०११ मध्ये होबार्टमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या न्यूझीलंडच्या शेवटच्या कसोटी विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुसऱ्या डावात ४० धावांत ६ बळी घेऊन त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली होती यामुळे संघाने ७ धावांनी विजय मिळवला होता. डग, तुला शानदार कारकिर्दीबद्दल अभिनंदन."
हा माझ्या आयुष्याचा अभिमानास्पद भाग... ब्रेसवलची भावुक प्रतिक्रिया
निवृत्ती जाहीर केल्यानंतर ब्रेसवेल म्हणाला की, “क्रिकेट माझ्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा आणि अभिमानाचा भाग राहिला आहे.एक तरुण क्रिकेटपटू म्हणून मी जे क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण झालं यासाठी मी खूप आभारी आहे. क्रिकेटच्या माध्यमातून मला देशासाठी तसेच सेंट्रल डिस्ट्रिक्ट्ससाठी खेळण्याची संधी मिळाली, याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे. प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. इतक्या वर्षांपर्यंत हा खेळ मनापासून खेळता आला, याचा मला अत्यंत आनंद आहे,” असे त्याने सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
डग ब्रेसवेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रेकॉर्ड्स
३५ वर्षीय डग ब्रेसवेलने २००८ मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ब्रेसवेलने ऑक्टोबर-नोव्हेंबर २०११ मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर सर्व प्रकारच्या स्वरूपांमध्ये पदार्पण केले. ब्रेसवेलने २०११ ते २०२३ दरम्यान २८ कसोटी, २१ एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळले आहेत. त्याने २८ कसोटी सामन्यात ७४ कसोटी विकेट्स, २१ एकदिवसीय सामन्यात २६ विकेट्स आणि टी-२० सामन्यात २० विकेट्स घेतले आहेत. त्याने कसोटीमध्ये ५६८, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २२१ तर टी-२० सामन्यात १२६ धावा केल्या. २०११ मध्ये होबार्टमध्ये न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत फक्त ६० धावा देऊन ९ विकेट्स घेतले.या शानदार कामगिरीमुळे न्यूझीलंडला २६ वर्षांनी ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकता आला.ब्रेसवेलने आंतरराष्ट्रीय स्तरावर शेवटचा सामना २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात खेळला होता.
आयपीएलमध्ये खेळला फक्त एकच सामना
ब्रेसवेलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) फक्त एकच सामना खेळला आहे. २०१२ च्या हंगामात, त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून पदार्पण केले. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध खेळताना तीन विकेट्स घेतल्या, ज्यात विराट कोहलीचाही समावेश होता.