
नवी दिल्ली : भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे भवितव्य आगामी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या कामगिरीवर अवलंबून आहे. द्रविडचा प्रशिक्षकपदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपुष्टात येणार असून यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सर्व आढावा घेऊनच पुढील निर्णय घेणार आहे.
५० वर्षीय द्रविडने नोव्हेंबर २०२१मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. त्यापूर्वी रवी शास्त्री भारताचे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र २०२१च्या टी-२० विश्वचषकात भारताला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्यानंतर शास्त्री यांनी प्रशिक्षकपद सोडले. तेव्हापासून भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा व राहुल द्रविड यांच्या पर्वाला प्रारंभ झाला. द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारताने गतवर्षी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली, तर यावर्षी जूनमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला. मात्र प्रतिष्ठित आयसीसी स्पर्धा जिंकण्यात भारताला दोन्ही वेळेस अपयश आले.
५ ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. मायदेशात यंदा विश्वचषक होत असल्याने भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. या स्पर्धेत भारताने किमान अंतिम फेरी गाठणे तरी अपेक्षित आहे. मात्र तसे न झाल्यास द्रविडचा कार्यकाळ वाढवण्यात येण्याची शक्यता कठीण आहे. तसेच बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार द्रविडच्या दोन वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर पुढील प्रशिक्षकाचा निर्णय घेण्यात येईल.
द्रविड फक्त कसोटी संघाचा प्रशिक्षक?
विश्वचषकानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर २०२४च्या सुरुवातीला इंग्लंडचा संघ भारतात कसोटी मालिकेसाठी येणार आहे. त्यामुळे द्रविडकडे फक्त भारताच्या कसोटी संघाचे प्रशिक्षकपद कायम ठेवण्याबाबत बीसीसीआय विचार करत असल्याचे समजते. मात्र मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अन्य पर्यायाचा बीसीसीआय शोध घेत आहे. इंग्लंडचा कसोटीमध्ये ब्रँडन मॅकक्युलम प्रशिक्षक आहे, तर एकदिवसीय व टी-२०मध्ये मॅथ्यू मॉट ही धुरा वाहतो. त्यामुळे भारतही ही पद्धत अवलंबणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
यांचे पर्याय उपलब्ध
द्रविडनंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी काही अनुभवी तसेच आधुनिक क्रिकेटला साजेसे प्रशिक्षकांचे पर्याय उपलब्ध आहेत. यांपैकी आशिष नेहराने मात्र २०२५पर्यंत गुजरात टायटन्सचेच प्रशिक्षकपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने तो या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग, भारताचा व्ही. व्ही. एस लक्ष्मण, झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर असे माजी क्रिकेटपटू तसेच अनुभवी प्रशिक्षकांचे पर्यायही बीसीसीआयकडे उपलब्ध आहेत.