नैराश्यामुळे आत्महत्येचाही विचार मनात डोकावला!

मानसिक समस्येवर मात करणाऱ्या निक किर्गियोसची कबुली
नैराश्यामुळे आत्महत्येचाही विचार मनात डोकावला!

सिडनी : २०१९मध्ये विम्बल्डनमधून गाशा गुंडाळल्यावर काही काळ निवृत्तीचा विचार मनात आला. त्यानंतर नैराश्य आल्यामुळे मी एकवेळ आत्महत्या करण्याचाही विचार केला, अशी कबुली ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू निक किर्गियोसने गुरुवारी दिली.

असंख्य दुखापती व मानसिक समस्येवर मात करून टेनिस कोर्टवर परतणाऱ्या किर्गियोसला बुधवारी एका स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. मात्र किर्गियोसने त्यानंतर चाहत्यांना त्याची पाठराखण करण्याची विनंती केली. तसेच कारकीर्दीतील कटू प्रसंगाची आठवण करून देताना आपण कशाप्रकारे आताही टेनिस खेळत आहोत, हे सांगितले. ब्रेक पॉइंट ही किर्गियोसवरील आधारीत डॉक्युमेंट्री लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये किर्गियोसवर विविध गोष्टींचा कशाप्रकारे मानसिक परिणाम झाला, याचा उलगडा करण्यात आला आहे.

“चार वर्षांपूर्वी नदालकडून विम्बल्डनमध्ये पराभूत झाल्यावर मी खरोखरंच रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झालो. माझ्या कारकीर्दीत किंबहुना आयुष्यात काय सुरू आहे, हे मला कळत नव्हते. माझे वडील माझ्या समोर बसून रडत होते. माझी कामगिरी सातत्याने ढासळत चालली होती,” असे किर्गियोस म्हणाला. २८ वर्षीय किर्गियोस गतवर्षी विम्बल्डनच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. तेथे नोव्हाक जोकोव्हिचने त्याला नमवले.

“मानसिक आरोग्याचे महत्त्व फार आहे. असंख्य क्रीडापटूंना नैराश्याला सामोरे जावे लागते. काही जण याविषयी बोलण्यास घाबरतात. परंतु ही एक गंभीर समस्या आहे. चाहत्यांच्या किंवा तुमच्या कुटुबीयांच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा तुमच्यावर अतिरिक्त दडपण टाकू शकतात. या दडपणामुळे कुणालाही नैराश्य येऊ शकते,” असेही किर्गियोसने सांगितले.

जोकोव्हिचला नमवण्यासाठी विम्बल्डन खेळणार

गेल्या काही महिन्यांपासून टेनिसपासून दूर राहिल्यानंतर किर्गियोस आता विम्बल्डनद्वारे ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये पुनरागमन करणार आहे. त्यातही विशेषत: जोकोव्हिचला नमवण्यासाठी आपण आतुर असल्याचे तो म्हणाला. “जोकोव्हिच किती महान आहे, याविषयी वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र सध्याच्या पिढीतही त्याला कोणी तरी हरवण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपन जिंकून आपणच नंबर वन असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. त्यामुळे किमान त्याला नमवण्यासाठी तरी मला विम्बल्डनच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारावी लागेलच,” असेही किर्गियोस गमतीने अखेरीस म्हणाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in