मुंबईच्या पहिल्या दोन पराभवांसाठी चाहत्यांसह माजी क्रिकेटपटूंनी धरले कर्णधाराला जबाबदार

भारताचा कर्णधार रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हिसकावून ३० वर्षीय हार्दिककडे सोपवण्याचा निर्णय संघाला अद्याप फळलेला नाही. गुजरातविरुद्ध मुंबईला ३६ चेंडूंत ४८ धावा करता आल्या नाहीत. त्याशिवाय हैदराबादविरुद्ध मुंबईने तब्बल २७७ धावा दिल्या.
मुंबईच्या पहिल्या दोन पराभवांसाठी चाहत्यांसह 
माजी क्रिकेटपटूंनी धरले कर्णधाराला जबाबदार

नवी दिल्ली : आयपीएलचा १७वा हंगाम सुरू होऊन एक आठवडा उलटला तरी मुंबई इंडियन्सला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. ५ वेळा चषक जिंकणाऱ्या मुंबईने अनुक्रमे गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून रोमहर्षक लढतींमध्ये पराभव पत्करला. मात्र या पराभवांमळे मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वकौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून समाज माध्यमांवरसुद्धा त्यालाच पराभवासाठी जबाबदार धरण्यात येत आहे. त्याशिवाय काही माजी क्रिकेटपटूंनीसुद्धा हार्दिकवर निशाणा साधला आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हिसकावून ३० वर्षीय हार्दिककडे सोपवण्याचा निर्णय संघाला अद्याप फळलेला नाही. गुजरातविरुद्ध मुंबईला ३६ चेंडूंत ४८ धावा करता आल्या नाहीत. त्याशिवाय हैदराबादविरुद्ध मुंबईने तब्बल २७७ धावा दिल्या. यामध्येही पहिल्या १० षटकांतच हैदराबादने १४०हून अधिक धावा केलेल्या असताना जसप्रीत बुमराने फक्त एकच षटक गोलंदाजी केली होती. त्यामुळे हार्दिकच्या रणनीतीवरही अनेकांनी टीका केली आहे. तसेच संघातील अन्य फलंदाजांनी लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तम झुंज दिली. मात्र हार्दिक स्वत: २० चेंडूंत २४ धावांतच बाद झाला. त्यामुळे हार्दिक आता पुढील सामन्यांमध्ये कर्णधार तसेच अष्टपैलू म्हणून कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरेल.

हार्दिक काय म्हणाला?

हैदराबादविरुद्ध मुंबईने २७७ धावा दिल्या. मात्र २४६ धावांपर्यंत मजल मारून त्यांना कडवी झुंज दिली. या पराभवानंतर हार्दिकने संघाची पाठराखण केली. “हैदराबादने अफलातून फलंदाजी केली. मात्र आम्ही त्यांना कडवी झुंज दिल्याचे समाधान आहे. गोलंदाजांसाठी आजचा दिवस संघर्षाचा होता. मात्र यातून आम्ही लवकरच सावरू. संघातील सर्व गोलंदाजांना माझा पूर्ण पाठिंबा आहे,” असे हार्दिक म्हणाला.

जेव्हा संघातील उर्वरित प्रमुख फलंदाज २००पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने फलंदाजी करतात, तेव्हा संघाचा कर्णधार फक्त १२०च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करू शकत नाही. त्याशिवाय प्रतिस्पर्धी संघाने १० षटकांत १४०हून अधिक धावा केलेल्या असताना तुमचा सर्वोत्तम गोलंदाज फक्त एकच ओव्हर टाकतो, हे अनाकलनीय आहे.

- इरफान पठाण

हार्दिक पहिल्या दोन सामन्यांत काहीसा दडपणाखाली दिसला. स्टेडियममधील चाहत्यांनीही त्याला डिवचले. मुंबई जेव्हा वानखेडेवर सामने खेळण्यास प्रारंभ करेल, तेव्हा हार्दिकची काय अवस्था होईल, याची मी कल्पना करू शकत नाही. मात्र तो यातून नक्कीच मार्ग काढेल.

- मनोज तिवारी

सूर्यकुमार आणखी एका लढतीला मुकणार

मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव पायाच्या दुखापतीमुळे तसेच स्पोर्ट्स हर्नियावरील शस्त्रक्रियेमुळे आयपीएलमधील आणखी एका लढतीला मुकण्याची शक्यता आहे. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) सूत्रांनी याविषयी माहिती दिली. सूर्यकुमारच्या तंदुरुस्तीत सातत्याने सुधारणा होत आहे. मात्र सामन्यासाठी १०० टक्के तंदुरुस्त होण्याकरता त्याला किमान एक आठवडा जाऊ शकतो, असे त्या पदाधिकाऱ्याने सांगितले. मुंबईचा पुढील सामना १ एप्रिल रोजी वानखेडेवर राजस्थान रॉयल्सशी होईल. त्यानंतर ७ एप्रिलला ते मुंबईतच दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करतील. किमान दिल्लीच्या लढतीपर्यंत सूर्यकुमार संघात परतेल, अशी आशा मुंबईच्या चाहत्यांना आहे.

logo
marathi.freepressjournal.in