Duleep Trophy 2024: भारत ‘ब’ने दिला ‘अ’संघाला दणका! ७६ धावांनी मारली बाजी

मुशीर खानच्या शतकी झंझावाताला मुकेश कुमार, यश दयाल आणि नवदीप सैनी या त्रिकुटाच्या शानदार गोलंदाजीची साथ मिळाल्याने भारत ‘ब’ संघाने भारत ‘अ’ला दणका देत दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ७६ धावांनी बाजी मारली
Duleep Trophy 2024: भारत ‘ब’ने दिला ‘अ’संघाला दणका! ७६ धावांनी मारली बाजी
Published on

बंगळुरू : मुशीर खानच्या शतकी झंझावाताला मुकेश कुमार, यश दयाल आणि नवदीप सैनी या त्रिकुटाच्या शानदार गोलंदाजीची साथ मिळाल्याने भारत ‘ब’ संघाने भारत ‘अ’ला दणका देत दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ७६ धावांनी बाजी मारली. विजयामुळे भारत ‘बी’ संघाच्या खात्यात ६ गुण जमा झाले आहेत.

भारत ‘ब’ संघाचा दुसरा डाव अवघ्या १८४ धावांवर संपुष्टात आल्याने ‘अ’ संघाला सामन्यात कमबॅक करण्याची संधी होती. विजयासाठी संघाला २७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. सामन्याच्या चौथ्या दिवशी रविवारी यश दयाल, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी ही गोलंदाजांची तिकडी भारत ‘अ’ संघाच्या फलंदाजांवर तुटून पडली. बर्थडे बॉय शुभमन गिल (२१ धावा), रियान पराग (३१ धावा) यांनी थोडाफार प्रतिकार केला. अनुभवी के. एल. राहुल (५७ धावा) भारत ‘ब’च्या विजयाआड उभा होता. अन्य फलंदाजांची त्याला हवी तशी साथ लाभली नाही. ध्रुव जुरेल, तनुष कोटीयन या मधल्या फळीतील भरवशाच्या फलंदाजांनी भोपळाही फोडला नाही. मुकेश कुमारने यष्टीरक्षक पंतकरवी सेट झालेल्या राहुलला बाद करत भारत ‘ब’च्या गोटात आनंद पसरवला. तळात आकाश दीपने ४३ धावांची फटकेबाजी करत आपल्या संघाचा पराभव लांबवला. मात्र तो टाळणे त्याला अशक्य झाले. मुशीर खानने आकाशला धावबाद करत संघाचा विजय जवळपास निश्चितच केला. दुसऱ्या डावात यश दयालने ३, तर मुकेश कुमार, नवदीप सैनी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. भारत ‘अ’ चा दुसरा डाव १९८ धावांवर संपुष्टात आला. भारत ‘ब’ने ७६ धावांनी हा सामना खिशात घातला.

तत्पूर्वी भारत ‘ब’चा दुसरा डाव १८४ धावांवर संपुष्टात आला. ऋषभ पंत (६१ धावा), सर्फराझ खान (४६ धावा) यांनी प्रभावी फलंदाजी केली. या डावात भारत ‘अ’च्या आकाश दीपने गोलंदाजीत छाप पाडली. त्याने ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याआधी पहिल्या डावात मुंबईकर मुशीर खानने १८१ धावांची मॅरेथॉन खेळी खेळली.

त्रिकुटाची शानदार गोलंदाजी

भारत ‘ब’ च्या विजयात मुकेश कुमार, यश दयाल आणि नवदीप सैनी या त्रिकुटाची गोलंदाजी महत्त्वपूर्ण ठरली. दोन्ही डावांत या तिन्ही गोलंदाजांनी भारत ‘अ’च्या फलंदाजांना सतावले. मुकेश कुमार, नवदीप सैनी यांनी पहिल्या डावात प्रत्येकी ३ बळी मिळवले. दुसऱ्या डावातही या दुकलीला प्रभाव पाडता आला. त्यांना नवदीप सैनीचीही चांगली साथ मिळाली. या तिघांनी मिळून दुसऱ्या डावात ७ फलंदाजांना तंबूत पाठवले. पहिल्या डावातही या त्रिकुटाने मिळून ७ फलंदाजांना माघारी धाडले होते.

logo
marathi.freepressjournal.in