बंगळुरू : रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मध्य विभागाने सोमवारी दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम फेरीत गतविजेत्या दक्षिण विभागाला ६ गडी राखून नमवत ११ वर्षांनी पुन्हा एकदा ही स्पर्धा जिंकली. एकंदर सातव्यांदा मध्य विभागाने दुलीप ट्रॉफी उंचावली.
बंगळुरू येथील बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मैदानात झालेल्या या लढतीत दुसऱ्या डावात दक्षिण विभागाने दिलेले ६५ धावांचे लक्ष्य मध्य विभागाने पाचव्या दिवशी २०.३ षटकांत गाठले. अक्षय वाडकर (नाबाद १९), पाटीदार (१३) व यश राठोड (नाबाद १३) यांनी मोलाचे योगदान दिले. पहिल्या डावात १९४ धावांची खेळी साकारणारा यश राठोड सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तर स्पर्धेतील ३ सामन्यांत १३६ धावा करण्यासह फिरकीच्या बळावर १६ बळी मिळवणारा सारांश जैन मालिकावीर ठरला. सारांशने अंतिम सामन्यातही एकूण ८ गडी टिपले.
उभय संघांतील या सामन्यात दक्षिण विभाग पहिल्या डावात १४९ धावांत गारद झाला. सारांशने पाच, तर कुमार कार्तिकेयने चार बळी मिळवले. मग पाटीदार (१०१) व यश (१९४) यांच्या शतकांमुळे मध्य विभागाने ५११ धावांचा डोंगर उभारून पहिल्या डावात ३६२ धावांची आघाडी मिळवली. सारांशने ६९ धावा केल्या. दुसऱ्या डावात दक्षिण विभागाने कडवा प्रतिकार करताना ४२६ धावा केल्या. रविचंद्रन स्मरण (६७), अंकित शर्मा (९९), आंद्रे सिद्धार्थ (नाबाद ८४) यांनी अर्धशतके झळकावली.
मात्र पहिल्या डावातील ३६२ धावांच्या पिछाडीमुळे दुसऱ्या डावात ४२६ धावा करूनही दक्षिण विभाग मध्य विभागापुढे ६५ धावांचेच लक्ष्य ठेवू शकला. गुर्जापनीत सिंगने एकाच षटकात दोन बळी मिळवून सामन्यात चुरस निर्माण केली होती. मात्र वाडकर, यश व पाटीदार यांनी मध्य विभागाला विजयरेषा गाठून दिली. त्यामुळे २०१४नंतर प्रथमच मध्य विभागाने दुलीप ट्रॉफी स्पर्धा जिंकली. त्यावेळी सुद्धा त्यांनी दक्षिण विभागालाच अंतिम फेरीत धूळ चारली होती.
पाटीदारने या वर्षात कर्णधार म्हणून दोन संघांना जेतेपद मिळवून दिले. त्याने आयपीएलमध्ये बंगळुरू संघाचे यशस्वी नेतृत्व केले, तर यावेळी मध्य विभागाला दुलीप ट्रॉफी जिंकवून दिली.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण विभाग (पहिला डाव) : १४९
मध्य विभाग (पहिला डाव) : ५११
दक्षिण विभाग (दुसरा डाव) : ४२६
मध्य विभाग (दुसरा डाव) : २०.३ षटकांत ४ बाद ६६ (अक्षय वाडकर नाबाद १९, यश राठोड १३; अंकित शर्मा २/२२)
सामनावीर : यश राठोड (पहिल्या डावात १९४ धावा)
मालिकावीर : सारांश जैन (१३६ धावा, १६ बळी)