
बंगळुरू : श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल या मुंबईच्या प्रतिभावान फलंदाजांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात दोघेही पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार असून बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मैदानात त्यांची मध्य विभागाशी गाठ पडणार आहे.
यंदा २८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत दुलीप ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सामने रणजीप्रमाणेच प्रत्येकी चार दिवसांचे असतील. या स्पर्धेद्वारेच यंदाच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाला प्रारंभ झाला. दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, मध्य व ईशान्य असे सहा संघ सहभागी झाले आहेत. २०२४मध्ये दक्षिण व पश्चिम विभागात अंतिम फेरी रंगली होती. त्यामुळे ते थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर उपांत्यपूर्व फेरीत उत्तर विरुद्ध पूर्व विभाग आणि मध्य विरुद्ध ईशान्य विभाग आमनेसामने आले. त्यांपैकी मध्य विभाग आणि उत्तर विभाग यांनी पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर उपांत्य फेरी गाठली.
या स्पर्धेत पश्चिम विभागाचे नेतृत्व मुंबईचाच अनुभवी अष्टपैलू शार्दूल ठाकूर करणार आहे. या संघात मुंबईच्या एकंदर सहा खेळाडूंचा समावेश आहे. श्रेयस अय्यरला पश्चिम विभागाचे नेतृत्व सोपवण्यात येण्याचा विचार सुरू होता. मात्र त्याने ते नाकारल्यामुळे शार्दूलची कर्णधारपदी निवड करण्यात आली. तसेच अजिंक्य रहाणेने मुंबईच्या रणजी संघाचे नेतृत्व सोडल्यावर आता तेथेही शार्दूलचीच निवड करण्यात येईल, असे समजते.
दरम्यान, आशिया चषकासाठी भारतीय संघातून वगळण्यात आल्यामुळे श्रेयस सध्या चर्चेत आहे. ऑक्टोबरपर्यंत भारताचा एकही एकदिवसीय सामना नसल्याने तो या स्पर्धेत खेळून तंदुरुस्ती राखण्यासह क्रिकेटशी जवळ राहू शकतो. ९ ते २८ सप्टेंबर या काळात युएईत आशिया चषक टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये भारत-वेस्ट इंडिज यांची कसोटी मालिका आहे. तर १९ ऑक्टोबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय व टी-२० मालिका खेळणार आहे.
२०२५च्या आयपीएलमध्ये ३० वर्षीय श्रेयसने पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. श्रेयसने १७ सामन्यांत १७५च्या स्ट्राइक रेटने ६०४ धावा केल्या. त्यापूर्वी मार्च महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रेयसने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. श्रेयस २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला आहे. तसेच यशस्वी हा आशिया चषकासाठी राखीव खेळाडूंत आहे. मात्र त्याला दुबईत जाण्याची संधी मिळणे कठीणच आहे. त्यामुळे दुलीप ट्रॉफीत खेळून तो एकदिवसीय व टी-२० संघातील स्थानासाठी दावेदारी पेश करताना दिसेल.
दुसरीकडे, रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मध्य विभागाने उपांत्यपूर्व लढतीत अनुक्रमे ५३२ व ३३१ धावांचा डोंगर उभारला होता. पाटीदारसह विदर्भाचा दानिश मलेवार, यश राठोड, शुभम शर्मा यांच्यावर मध्य विभागाची फलंदाजीत भिस्त आहे. गोलंदाजीत दीपक चहर, खलिल अहमद व आदित्य ठाकरे यांच्यावर लक्ष असेल. कुलदीप यादव आशिया चषकासाठी भारतीय संघाचा भाग असल्याने तो या लढतीला मुकणार आहे.
दक्षिण-उत्तर विभाग आमनेसामने
बंगळुरूतच होणाऱ्या अन्य उपांत्य लढतीत दक्षिण विभागासमोर उत्तर विभागाचे आव्हान असेल. तिलक वर्मा आशिया चषकासाठी भारतीय संघात असल्याने मोहम्मद अझरुद्दीने दक्षिण विभागाचे नेतृत्व करेल. त्यांच्या संघात देवदत्त पडिक्कल, एन. जगदीशन, बसिल थम्पी असे खेळाडू आहेत. दुसरीकडे अंकित कुमारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या उत्तर विभागाने उपांत्यपूर्व लढतीत ईशान्य विभागाविरुद्ध अनुक्रमे ४०५ व ६५८ धावा केल्या. आयुष बदोनी, यश धूल, निशांत सिंधू असे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. तर गोलंदाजीत मयांक डागर, गुर्नूर ब्रार यांच्यावर लक्ष असेल. दक्षिण विभाग हा गतविजेता असला, तरी यावेळी प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत ते कशी कामगिरी करणार, हे पाहणे रंजक ठरेल.