दुलीप ट्रॉफी : ऋतुराजचे शतकी पुनरागमन! पहिल्या दिवसअखेर पश्चिम विभाग ६ बाद ३६३; श्रेयस, यशस्वी अपयशी

महाराष्ट्राचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडने (२०६ चेंडूंत १८४ धावा) गुरुवारी दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात शानदार दीडशतकासह पुनरागमन केले.
दुलीप ट्रॉफी : ऋतुराजचे शतकी पुनरागमन! पहिल्या दिवसअखेर पश्चिम विभाग ६ बाद ३६३; श्रेयस, यशस्वी अपयशी
छाया - एक्स (@CSKFansOfficial)
Published on

बंगळुरू : महाराष्ट्राचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडने (२०६ चेंडूंत १८४ धावा) गुरुवारी दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात शानदार दीडशतकासह पुनरागमन केले. यशस्वी जैस्वाल (३ चेंडूंत ४) व श्रेयस अय्यर (२८ चेंडूंत २५) यांचे अपयश भरून काढत ऋतुराजने साकारलेल्या शतकामुळे पश्चिम विभागाने मध्य विभागाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ८७ षटकांत ६ बाद ३६३ धावांपर्यंत मजल मारली.

यंदा २८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत दुलीप ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सामने रणजीप्रमाणेच प्रत्येकी चार दिवसांचे आहेत. दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, मध्य व ईशान्य असे सहा संघ सहभागी झाले होते. २०२४मध्ये दक्षिण व पश्चिम विभागात अंतिम फेरी रंगली होती. त्यामुळे ते थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले, तर उपांत्यपूर्व फेरीत उत्तर विरुद्ध पूर्व विभाग आणि मध्य विरुद्ध ईशान्य विभाग आमनेसामने आले. त्यांपैकी मध्य विभाग आणि उत्तर विभाग यांनी पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर उपांत्य फेरी गाठली.

या स्पर्धेत पश्चिम विभागाचे नेतृत्व मुंबईचाच अनुभवी अष्टपैलू शार्दूल ठाकूर करणार आहे. मुंबईचे एकूण सहा खेळाडू पश्चिम विभागाच्या संघात आहेत. तर मध्य विभागाचे नेतृत्व आयपीएलमध्ये बंगळुरूला जेतेपद मिळवून देणारा रजत पाटीदार करत आहे. पाटीदार हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो. आशिया चषकासाठी भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या श्रेयस व यशस्वीच्या कामगिरीकडे या सामन्यात सर्वांचे लक्ष होते.

दरम्यान, बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मैदानात सुरू असलेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पश्चिम विभागाची सुरुवात खराब झाली. यशस्वी व हार्विक देसाई (१) यांची सलामी जोडी १० धावांतच माघारी परतली. खलिल अहमद व दीपक चहर यांनी दोघांना माघारी धाडले. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या ऋतुराजने संघाला सावरले. आयपीएलमध्ये एप्रिल महिन्यात २८ वर्षीय ऋतुराज अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो क्रिकेटपासून दूर होता. ५ महिन्यांनी शानदार पुनरागमन करताना त्याने २५ चौकार व १ षटकारासह १८४ धावांची खेळी साकारली.

ऋतुराजने तिसऱ्या विकेटसाठी आर्य देसाईसह (३९) ८२ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर मुंबईकर श्रेयसही झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात ४ चौकारांसह २४ धावांवर बाद झाला. खलिलने त्याचा त्रिफळा उडवला. शम्स मुलाणीने १८ धावांचे योगदान दिले. ५ बाद १७९ अशा स्थितीतून ऋतुराजने मग खडूस अष्टपैलू तनुष कोटियनसह पुन्हा एकदा खिंड लढवली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी रचली.

विशेषत: तनुषने ५ चौकारांसह १२१ चेंडूंत अर्धशतक झळकावून आपले महत्त्व अधोरेखित केले. अखेर ७५व्या षटकात फिरकीपटू सारांश जैनने ऋतुराजचा अडसर दूर केला. मात्र त्यानंतर कर्णधार शार्दूल व तनुष या मुंबईच्या जोडीने सातव्या विकेटसाठी ३६ धावांची भर घातली आहे. दिवसअखेर तनुष ६५, तर शार्दूल २४ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे ही जोडी दुसऱ्या दिवशीही मध्य विभागाला सतावू शकते. मध्य विभागासाठी खलिल व सारांशने प्रत्येकी २ बळी मिळवले आहेत.

संक्षिप्त धावफलक

-पश्चिम विभाग (पहिला डाव) : ८७ षटकांत ६ बाद ३६३ (ऋतुराज गायकवाड १८४, तनुष कोटियन नाबाद ६५, आर्य देसाई ३९; खलिल अहमद २/७०)

logo
marathi.freepressjournal.in