

चेन्नई : अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने घेतलेल्या दोन महत्त्वपूर्ण बळींच्या जोरावर पूर्व विभागाने दुलीप ट्रॉफीच्या विजेतेपदाच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे. पूर्व विभागाने ७०८ धावांचा डोंगर उभारल्यानंतर प्रत्युत्तरादाखल दक्षिण विभागाची ६ बाद २४२ अशी बिकट अवस्था झाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार तिलक वर्मा (५६) आणि सी. व्ही. मिलिंद (०) खेळपट्टीवर होते. दक्षिण विभाग अजूनही ४६६ धावांनी मागे असून फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
चेन्नईतील दमट हवामानामुळे शमीने विविध टप्प्यांत गोलंदाजी केली. त्याने ११ षटकांत ४ निर्धाव फेकत १७ धावा देऊन २ बळी टिपले. फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर शमीने अचूक टप्प्यावर मारा केला. तिसऱ्या गड्यासाठी शेख रशीद (२९) आणि देवदत्त पडिक्कल (६२) यांनी ५६ धावांची भागीदारी रचली होती. ही जोडी धोकादायक ठरेल असे वाटत असतानाच शमीने रशीदला पायचीत पकडले. यानंतर शमीने रवीचंद्रन स्मरणला यष्टीरक्षक कुमार कुशाग्रकरवी झेलबाद करत दक्षिण विभागाला आणखी एक धक्का दिला.
दुसऱ्या बाजूने बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने पडिक्कलची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. पडिक्कलने ६५ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते, परंतु मुकेशच्या गोलंदाजीवर फ्लिक मारण्याच्या प्रयत्नात तो सीमारेषेवर डी. पी. दासकडे झेल देऊन बसला. त्याआधी मुकेशने उपकर्णधार रिकी भुईलाही झेलबाद केले होते. नारायण जगदीशन (३२) चांगल्या लयमध्ये दिसत होता, पण अंशकालिक फिरकीपटू शिखर मोहनच्या गोलंदाजीवर अभिमन्यू ईश्वरनकडे झेल देऊन तो बाद झाला.
दक्षिण विभागाकडून तिलक वर्माने सलग तिसरे अर्धशतक ठोकताना श्रेयस गोपालसोबत (२६) ६६ धावा जोडल्या. मात्र, दिवसाच्या शेवटच्या काही मिनिटांत श्रेयस बाद झाल्यामुळे दक्षिण विभागाच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. पूर्व विभागाकडून अनुकुल रॉयच्या हाताला दुखापत झाल्यामुळे शिखर मोहनला लवकर गोलंदाजीला आणावे लागले.
तत्पूर्वी, कर्णधार आणि डावखुरा फलंदाज इशान किशनने झळकावलेल्या ३३४ चेंडूंतील २७० धावांच्या शानदार अडीच शतकी खेळीच्या बळावर पूर्व विभागाने पहिल्या डावात तब्बल ७०८ धावांचा डोंगर उभारला. कुमार कुशाग्रनेही १०१ धावांची शतकी खेळी साकारली. पूर्व विभागाकडून द्विशतक झळकावणारा किशन हा गेल्या ३१ वर्षांतील पहिलाच फलंदाज आहे. १९९५मध्ये सबा करीम यांनी हा पराक्रम करून दाखवला होता.
संक्षिप्त धावफलक
पूर्व विभाग (पहिला डाव) : १६३ षटकांत सर्व बाद ७०८ (इशान किशन २७०, कुमार कुशाग्र १०१)
दक्षिण विभाग (पहिला डाव) : ८० षटकांत ६ बाद २४२ (देवदत्त पडिक्कल ६२, तिलक वर्मा नाबाद ५६; मोहम्मद शमी २/१७)