चेन्नई : कर्णधार आणि डावखुरा फलंदाज इशान किशनने सोमवारचा दिवसही गाजवला. त्याने झळकावलेल्या ३३४ चेंडूंतील २७० धावांच्या शानदार अडीच शतकी खेळीच्या बळावर पूर्व विभागाने दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाविरुद्ध पहिल्या डावात तब्बल ७०८ धावांचा डोंगर उभारला. कुमार कुशाग्रनेही १०१ धावांची शतकी खेळी साकारली.
तीन राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या उपस्थितीत किशनने ही तुफानी खेळी साकारली. दुलीप ट्रॉफीमध्ये त्रिशतक झळकावणाऱ्या रमण लांबा (१९८७) आणि गगन खोडा (२००१) यांच्या एलिट क्लबमध्ये सामील होण्याची संधी किशनची थोडक्यात हुकली. किशनचे पहिले शतक १२२ चेंडूंत पूर्ण झाले होते, तर दुसरे शतक करण्यासाठी त्याने १४८ चेंडू घेतले. देवदत्त पडिक्कलच्या चेंडूवर चौकार मारत किशनने २७० चेंडूंत कारकिर्दीतील दुसरे प्रथम श्रेणी द्विशतक पूर्ण केले. डावादरम्यान डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज सी. व्ही. मिलिंदचा चेंडू पोटावर लागल्याने किशनला वैद्यकीय उपचारांची गरज भासली होती.
द्विशतकानंतर किशनने आक्रमक रूप धारण करत अवघ्या ३१ चेंडूंत २०० वरून २५० धावांचा टप्पा गाठला. फिरकीपटू श्रेयस गोपाल आणि त्रिपुराना विजय यांच्या गोलंदाजीवर त्याने प्रत्येकी दोन षटकार ठोकले. किशनच्या या आक्रमणामुळे पूर्व विभागाने पहिल्या सत्रात १०६ आणि उपाहारानंतर १३५ धावांची भर घातली. किशनने कुशाग्रसोबत पाचव्या गड्यासाठी २९० चेंडूंत २३० धावांची आणि अनुकूल रॉयसोबत (४०) सहाव्या गड्यासाठी १४० धावांची भागीदारी केली.
त्याशिवाय २१ वर्षीय कुशाग्रने १२८ चेंडूंत ८ चौकार आणि ५ षटकारांसह शतक ठोकले, मात्र विजयच्या गोलंदाजीवर मिलिंदकडे झेल देऊन तो बाद झाला. २५० धावांवर थकवा जाणवल्याने किशन मैदानाबाहेर गेला होता. अंतिम सत्राच्या सुरुवातीला मोहम्मद शमी बाद झाल्यानंतर किशन पुन्हा फलंदाजीला आला. मात्र, त्रिपुराना विजयच्या (४/१८०) चेंडूवर साइट स्क्रीनजवळ उभ्या असलेल्या रविचंद्रन स्मरणकडे झेल देऊन किशन २७० धावांवर बाद झाला. त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर मुकेश कुमारला बाद करून विजयने पूर्व विभागाचा पहिला डाव १६३ षटकांत ७०८ धावांवर संपला.
आता तिसऱ्या दिवशी दक्षिण विभागाचे फलंदाज कसा प्रतिकार करणार, हे पाहणे रंजक ठरेल. पहिल्या डावातील आघाडीवर लढतीचा निकाल लागू शकतो.
अपेक्षांचे ओझे बाळगत नाही!
२७० धावांची महाकाय खेळी उभारल्यानंतर भारतीय फलंदाज किशनने आपल्या यशाचे रहस्य उलगडले आहे. कारकीर्दीतील कठीण कालावधीनंतर फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण अतिविचार करणे टाळून अपेक्षांचे ओझे बाजूला ठेवल्याचे त्याने स्पष्ट केले. पूर्व विभागाचा कर्णधार म्हणून साकारलेली ही खेळी आपल्यातील अंतर्गत बदलाचे फलित असल्याचे किशनने सोमवारी सांगितले. “मी स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल करण्याचा प्रयत्न केला नाही, तर ते नैसर्गिकरीत्या घडत गेले. भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर मला जाणवले की, फलंदाज म्हणून मैदानात उतरून धावा करणे हेच आपले एकमेव काम आहे आणि तेच कारकिर्दीत मदतीला येते. इतर सर्व विचार मानसिकतेवर परिणाम करतात, अतिविचार करायला लावतात आणि अनावश्यक दबाव वाढवतात. मैदानात उतरून संघाला विजय मिळवून देणे हेच महत्त्वाचे असते.” २०२३ मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या किशनला बीसीसीआयचा करार गमवावा लागला होता. मात्र, रणजी ट्रॉफीत सातत्याने शतके झळकावून आणि मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ५१७ धावा करत संघाला जेतेपद मिळवून देत त्याने जोरदार पुनरागमन केले. यामुळे त्याला पुन्हा भारतीय संघात आणि वार्षिक करारातही स्थान मिळाले.
पूर्व विभागाकडून दुलीप ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा किशन हा गेल्या ३१ वर्षांतील पहिलाच फलंदाज आहे. यापूर्वी १९९५मध्ये सबा करीम यांनी हा पराक्रम केला होता.
किशन हा दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावणारा सातवा फलंदाज ठरला. यापूर्वी रमण लांबा, अंशुमन गायकवाड, मन्सूर अली खान पतौडी, चेतेश्वर पुजारा, युसूफ पठाण, यशस्वी जैस्वाल यांनी ही कामगिरी केली होती.
किशनने दुलीप ट्रॉफीतील आठव्या क्रमाकांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. रमण लांबा (३२०), गगन खोडा (नाबाद ३००), सुरेंद्र भावे (२९२), अरुण लाल (२८७), संजय मांजरेकर (२७८), लालचंद राजपूत (२७५), विरेंद्र सेहवाग (२७४) हे सात खेळाडू किशनच्या पुढे आहेत.
पूर्व विभागाने (७०८ धावा) दुलीप ट्रॉफीतील सातव्या क्रमांकाची सर्वोत्तम सांघिक धावसंख्या रचली. तसेच त्यांनी प्रथमच या स्पर्धेत सातशेहून अधिक धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
पूर्व विभाग (पहिला डाव) : १६३ षटकांत सर्व बाद ७०८ (इशान किशन २७०, कुमार कुशाग्र १०१; त्रिपुराना विजय ४/१८०)