

बंगळुरू : कर्णधार तिलक वर्माच्या (७९ चेंडूंत नाबाद ५१ धावा) सलग दुसऱ्या प्रभावी खेळीच्या जोरावर दक्षिण विभागाने दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात उत्तर विभागाचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह दक्षिण विभागाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. येत्या ६ सप्टेंबरपासून चेन्नई येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा सामना पूर्व विभागाशी होणार आहे. तिलकने पहिल्या डावात शतक साकारले होते.
विजयासाठी १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण विभागाने चौथ्या दिवशी पहिल्या दोन सत्रांतच सामना संपवला. तिलक वर्मा (नाबाद ५१) आणि रविचंद्रन स्मरण (नाबाद ३२) यांनी चौथ्या गड्यासाठी ८० धावांची अबाधित भागीदारी रचत संघाला विजयापर्यंत पोहोचवले. दुसऱ्या सत्राच्या अखेरीस दक्षिण विभागाने ३ गड्यांच्या मोबदल्यात १८२ धावा करून विजय साकारला. पहिल्या डावात नाबाद ११६ धावा करत संघाला ११७ धावांची आघाडी मिळवून देणारा तिलक वर्मा फलंदाजीला आला, तेव्हा संघ १०२ धावांवर ३ बाद अशा अडचणीत होता. आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार असलेल्या डाव्या हाताच्या तिलकने उत्तर क्षेत्राच्या गोलंदाजांचा संयमाने सामना केला. वेगवान गोलंदाज गुर्नूर ब्रार आणि डावखुरा फिरकीपटू आबिद मुश्ताक यांच्या आव्हानांना त्याने आकर्षक फटकेबाजी करत उत्तर दिले. स्मरणने त्याला योग्य साथ देत एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला आणि निशांत सिंधूच्या गोलंदाजीवर सुरेख ड्राईव्ह लगावले.
तत्पूर्वी, नारायण जगदीशन (४३) आणि रिकी भुई (४२) यांनी पहिल्या गड्यासाठी ६४ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. उत्तर विभागाने चौथ्या दिवशी ७ बाद २५६ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि अंशुल कंबोजच्या २९ चेंडूंतील ३६ धावांच्या मदतीने आपली एकूण आघाडी १८० धावांपर्यंत वाढवली होती. मात्र, खराब क्षेत्ररक्षण आणि तिलक-स्मरणच्या सुरेख फलंदाजीमुळे उत्तर क्षेत्राचे आव्हान संपुष्टात आले. तिलकने कमरान इक्बालच्या गोलंदाजीवर चौकार मारून दक्षिण विभागाने विजयावर शिक्कामोर्तब केले.