दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा : पश्चिम विभागाचे आव्हान संपुष्टात

डावखुरा फिरकीपटू आबिद मुश्ताक आणि निशांत सिंधू यांनी अवघ्या ६.३ षटकांत पश्चिम विभागाच्या तळाच्या फलंदाजांना तंबूत धाडत उत्तर विभागाला दुलीप करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचवले.
दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा : पश्चिम विभागाचे आव्हान संपुष्टात
दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा : पश्चिम विभागाचे आव्हान संपुष्टातX | BCCI
Published on

बंगळुरू : डावखुरा फिरकीपटू आबिद मुश्ताक आणि निशांत सिंधू यांनी अवघ्या ६.३ षटकांत पश्चिम विभागाच्या तळाच्या फलंदाजांना तंबूत धाडत उत्तर विभागाला दुलीप करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचवले.

चौथ्या दिवशी विजयासाठी २८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पश्चिम विभागाने ७ बाद २२० धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली, मात्र अखेरचा फलंदाज उर्विल पटेल (२५) आणि तनुष कोटियन (०) क्रीझवर असताना संपूर्ण संघ ५७.३ षटकांत २३४ धावांत गारद झाला. उत्तर विभागाने हा सामना ५२ धावांनी जिंकून उपांत्य फेरीत दक्षिण विभागाविरुद्धची लढत पक्की केली. चौथ्या दिवशी मुश्ताकने तनुष कोटियनला लवकर बाद करत पश्चिम विभागाला पहिला धक्का दिला. त्यानंतर तुषार देशपांडेला (५) अब्दुल समदकरवी झेलबाद करत त्याने दुसरी सफलता मिळवली. मुश्ताकने २२ षटकांत ६० धावा देत ४ बळी घेतले, तर सामन्यात एकूण ९९ धावांत ९ बळी मिळवणाऱ्या मुश्ताकला 'सामनावीर' घोषित करण्यात आले. निशांत सिंधूने उर्विल पटेलला पायचीत पकडून पश्चिम विभागाचा दुसरा डाव संपुष्टात आणला.

या सामन्याचा खरा निर्णायक क्षण म्हणजे पश्चिम विभागाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (७० चेंडूंत ६६ धावा) धावचित होणे हा ठरला. ऋतुराजने मुशीर खान (९६) सोबत तिसऱ्या गड्यासाठी ११५ धावांची भक्कम भागीदारी केली होती. त्या वेळी पश्चिम विभाग ३ बाद १९५ धावा अशा सुस्थितीत होता, मात्र अवघ्या २५ धावांच्या मोबदल्यात ऋतुराज आणि मुशीरसह ४ फलंदाज बाद झाल्याने पश्चिम विभागाचा पाया खचला.

उत्तर विभागाने पहिल्या डावात २५१ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात २२२ धावा केल्या होत्या. रणजी करंडक स्पर्धेत ८२८ धावा करणाऱ्या सनत सांगवानला वगळून अवघ्या ३८१ धावा करणाऱ्या यश धुलला संधी देण्याचा उत्तर विभागाचे प्रशिक्षक अजय शर्मा आणि सरनदीप सिंग यांचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला होता, कारण धुलने ९ आणि ० अशा अपयशी खेळी केल्या. आता ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या उपांत्य फेरीत उत्तर विभागाचा सामना दक्षिण विभागाशी तर पूर्व विभागाचा सामना मध्य विभागाशी होईल.

२८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुशीर खान (१२६ चेंडूंत ९६ धावा) आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड (७० चेंडूंत ६६ धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पश्चिम विभाग मजबूत स्थितीत होता. मात्र, उत्तर विभागाच्या गोलंदाजांनी अखेर बाजी मारली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in