अनंतपूर : निवड समितीची नाराजी ओढवून घेतलेला धडाकेबाज फलंदाज आणि यष्टिरक्षक इशान किशनने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत शानदार शतक ठोकत पुनरागमन केले. दुलीप करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात इशानच्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर भारत क संघाने भारत ब संघाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३५७ धावा उभारत पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवले.
गेल्या आठवड्यात झालेल्या दुलीप ट्रॉफीच्या सलामीच्या फेरीत इशान किशनला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. मात्र तरीही भारत क संघाने भारत ड संघाचा पराभव केला होता. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दुलीप ट्रॉफी अत्यंत महत्त्वाची स्पर्धा असल्यामुळे या स्पर्धेतील कामगिरीवर साऱ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत. त्यातच इशानच्या वादळी खेळीने त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अभिमन्यू ईश्वरनने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले आणि क संघाचे ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. पण ऋतुराज ४ धावांवर असताना जखमी झाला आणि त्याने निवृत्ती पत्करली. पण त्यानंतर सुदर्शनसह रजत पाटिदार याने संघाला ९६ धावांपर्यंत नेले. पाटिदार (४०) बाद होताच पाठोपाठ सुदर्शनही (४३) बाद झाला. ४ चेंडूंत २ विकेट गमावल्यामुळे भारत क अडचणीत आला होता. तेव्हा इशान किशनचे आगमन झाले आणि त्याने क्षणार्धात डावाची सर्व सूत्रे आपल्या खांद्यावर घेत बाबा इंद्रजीतसह तुफान फटकेबाजी केली. दोघांनी १८९ धावांची दमदार भागीदारी रचत संघाला ६५ षटकांतच त्रिशतकासमीप नेले. इशानने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देताना १२४ चेंडूंत १११ धावांची खेळी साकारली. यात १४ चौकारांसह ३ षटकारांचाही समावेश होता.
इशान बाद झाल्यावर बाबा इंद्रजितची खेळीही ७८ धावांवर संपुष्टात आली. दोन धक्के बसल्यामुळे डावाच्या सुरुवातीलाच रिटायर्ड हर्ट झालेला कर्णधार ऋतुराज गायकवाड पुन्हा मैदानात परतला. दिवसाचा खेळ संपण्याच्या मार्गावर असताना अभिषेक पोरेल बाद झाला. पण त्यानंतर अंधुक प्रकाशामुळे ७९ व्या षटकातच खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबला तेव्हा भारत क संघाने ४.५१ धावांच्या सरासरीने ३५७ धावा केल्या आहेत. ब संघाकडून मुकेश कुमारने ७६ धावांत ३ विकेट टिपल्या.
शम्स मुलानीच्या ८८ धावा
भारत ड संघाच्या सुरेख गोलंदाजीसमोर भारत अ संघाचे आघाडीचे फलंदाज सपेशल अपयशी ठरल्यानंतर मुंबईकर शम्स मुलानी संघासाठी धावून आला. रियान परागच्या ३७ धावांच्या खेळीनंतरही भारत अ संघाची अवस्था ५ बाद ९३ अशी झाली असताना शम्स मुलानीने आधी कुमार कुशाग्रा आणि नंतर मुंबईच्या तनुष कोटियनसह भारत अ संघाचा डाव सावरला. कुशाग्रा २८ धावांवर तंबूत परतल्यानंतर मुलानी आणि कोटियन या मुंबईकर फलंदाजांनी ९१ धावांची भागीदारी रचत भारत अ संघाला सुस्थितीत आणले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत अ संघाने ८२ षटकांत ८ बाद २८८ धावा केल्या आहेत. मुलानी ८ चौकार आणि ३ षटकारांसह ८८ धावांवर खेळत आहे. कोटियन याने ६ चौकार आणि १ षटकारासह ५३ धावा चोपल्या.