दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा: सूर्यकुमार दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकणार

हाताला झालेल्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवला ५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. या स्पर्धेसाठी सूर्यकुमारचा भारत ‘क’ संघात समावेश करण्यात आला होता.
दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा: सूर्यकुमार दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकणार
Published on

मुंबई : हाताला झालेल्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवला ५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. या स्पर्धेसाठी सूर्यकुमारचा भारत ‘क’ संघात समावेश करण्यात आला होता.

गेल्या आठवड्यात बुची बाबू स्पर्धेत तमिळनाडू एकादशविरुद्धच्या लढतीत सूर्यकुमारच्या उजव्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याला फलंदाजी करता आली नाही. मात्र, त्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे त्या वेळी सांगण्यात आले होते. परंतु त्याच्या हाताला झालेली दुखापत बरी होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याने तो दुलीप करंडकातील भारत ‘ड’ संघाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दुखापतीवर उपचार घेण्यासाठी तो बंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) दाखल झाला आहे.

सूर्यकुमारची टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याला केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.

अंकोलाच्या जागी रात्रा निवड समितीत

भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज अजय रात्रा यांची राष्ट्रीय निवड समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. नियमानुसार पाचही सदस्य विविध विभागांचे (पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व मध्य) प्रतिनिधित्व करणारे असणे गरजेचे आहे. अजित आगरकर हे पश्चिम विभागातून निवड समितीचे अध्यक्ष झाल्याने या विभागाचे अन्य सदस्य सलील अंकोला यांचे पद धोक्यात आले. अखेर अंकोलाच्या जागी उत्तर विभागाच्या रात्रा यांचा समावेश करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in