इशान, तिलक, पडिक्कलवर नजरा; दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी आजपासून

दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारपासून दक्षिण विभाग आणि पूर्व विभाग यांच्यात रंगणार आहे.
इशान, तिलक, पडिक्कलवर नजरा; दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी आजपासून
इशान, तिलक, पडिक्कलवर नजरा; दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी आजपासून(Photo-X/@BCCIdomestic)
Published on

चेन्नई: दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारपासून दक्षिण विभाग आणि पूर्व विभाग यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात देवदत्त पडिक्कल, वैभव सूर्यवंशी आणि तिलक वर्मा हे तरुण फलंदाज लाल चेंडूच्या मालिकेतील आपली छाप अधिक मजबूत करण्यासाठी उत्सुक असतील, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आगामी महत्त्वाच्या दौऱ्यांपूर्वी आपली लय शोधण्याचा प्रयत्न करेल.

कर्नाटकचा फलंदाज देवदत्त पडिक्कलने साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे भारतीय संघात मिळालेल्या संधीचे सोने केले होते. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने दोन शतके झळकावून 'प्लेअर ऑफ द सीरिज'चा पुरस्कार पटकावला होता. आता दक्षिण विभागाला २०२३ नंतर पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून देण्यासाठी आणि तिसऱ्या क्रमांकावरील आपले स्थान मजबूत करण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.

भारताचा टी-२० संघाचा उपकर्णधार आणि दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्माने उत्तर विभागाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात नाबाद शतक आणि अर्धशतक ठोकून भारतीय कसोटी संघात निवडीसाठी दावा मजबूत केला आहे. दुसरीकडे, पूर्व विभागाच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने मध्य विभागविरुद्ध ९२ आणि ४० धावांची खेळी करून आपला खेळ केवळ चौकार-षटकार मारण्यापुरता मर्यादित नसल्याचे दाखवून दिले आहे.

अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त विद्वत कावेरप्पाच्या जागी संघात येऊ शकतो. न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी त्याला त्याच्या गोलंदाजीची लय परत मिळवणे गरजेचे आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत सिराजचा वेग ताशी १३५ किमीपेक्षा कमी राहिला होता, ज्यामुळे कर्णधार शुभमन गिलने त्याच्या लयीबाबत चिंता व्यक्त केली होती. पूर्व विभागाचे नेतृत्व इशान किशन करणार

असून, पुढील आठवड्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या द्वेन्टी-२० मालिकेपूर्वी त्याला या सामन्यातून चांगला सराव मिळेल. के. एल. राहुलदेखील न्यूझीलंड दौऱ्याच्या तयारीसाठी या लाल चेंडूच्या सामन्यात खेळण्यास उत्सुक असेल, परंतु सामन्याच्या २४ तास आधीपर्यंत तो दक्षिण विभागाच्या ताफ्यात दाखल झाला नव्हता. पूर्व विभागाच्या प्रभावी

गोलंदाजी ताफ्यात अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मुकेश कुमार आणि फिरकीपटू अनुकूल रॉय यांचा समावेश आहे. शमीचा हा १०० वा प्रथम श्रेणी सामना असणार आहे. प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि द्वेन्टी-२० सामन्यांमध्ये ९०३ बळी घेणारा ३६ वर्षीय शमी मार्च २०२५ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी

फायनलनंतर भारतीय संघाबाहेर आहे, तरीही या सामन्यातील दमदार कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्याचा त्याचा प्रयत्न असेल. शमीने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे, मात्र दुलीप करंडक स्पर्धेदरम्यान पुनरागमन करत शमीने आपल्या भेदक गोलंदाजीद्वारे विकेट्स मिळवत छाप पाडली आहे.

शमीचा धारदार स्पेल विजयात महत्त्वपूर्ण

मोहम्मद शमीने आपला शेवटचा सामना मार्च २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळला होता. ३६ वर्षांचा असूनही अद्यापही आपल्या धारदार गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना मैदानावर ठाण मांडू न देणाऱ्या शमीचा स्पेल यावेळीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दुलीप ट्रॉफीची ही अंतिम लढत शमीसाठी महत्त्वाची असणार आहे. पुढील पाच दिवसांत सर्वोत्तम गोलंदाजी करून भारतीय संघातील दावेदारी पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी त्याची धडपड असेल.

प्रतिस्पर्धी संघ

दक्षिण विभाग : तिलक वर्मा (कर्णधार), रिकी भुई, एसके रशीद, के. साई तेजा, अभिनव तेजराणा, के, हिमातेजा, टी. त्यागराजन, आर. स्मरण, करुण नायर, श्रेयस गोपाळ, विद्वथ कावेरप्पा, एमडी निधीश, एन. जगदीशन, अमन खान, लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, मोहम्मद सिराज.

पूर्व विभाग : इशान किशन, वैभव सूर्यवंशी, देनिश दास, अभिमन्यू ईश्वरन, सुदीप कुमार घरमी, शाहबाझ अहमद, सुरज सिंधू जैस्वाल, मोहम्मद शमी, मुकेश कुमार, अनुकूल रॉय, कुमार कुशाग्रा, शिखर मोहन, विराट सिंग, सुभ्रांशू सेनापती, अभिजीत सरकार.

सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वाजल्यापासून

logo
marathi.freepressjournal.in