

बंगळुरू : डावखुरा फिरकीपटू आबिद मुश्ताक आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्या प्रभावी माऱ्याच्या बळावर दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उत्तर विभागाने पश्चिम विभागाविरुद्ध पहिल्या डावात ६४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. पश्चिम विभागाची फलंदाजी ढेपाळल्याने त्यांचा संघ ६५.४ षटकांत १८७ धावांत गारद झाला.
२३ ऑगस्टपासून देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सुरू झाला. या स्पर्धेत दोन उपांत्यपूर्व सामने सुरू आहेत. उत्तर विभागाच्या मुश्ताकने २५.५ षटकांत ३९ धावा देऊन ५ गडी बाद केले, तर अर्शदीपने ५३ धावांत ३ बळी घेतले. पश्चिम विभागाकडून शम्स मुलानीने ९४ चेंडूंत ५२ धावांची झुंज दिली, तर मुशीर खानने ३१ धावा केल्या.
दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या उत्तर विभागाची सुरुवात अडखळती झाली. विवादित निवड ठरलेला माजी १९ वर्षांखालील विश्वचषक विजेता कर्णधार यश धुल पहिल्या डावातील अपयशानंतर दुसऱ्या डावातही शून्यावर बाद झाला. शम्स मुलानीच्या चेंडूवर तो पायचीत झाला. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा उत्तर विभागाने दुसऱ्या डावात ४ बाद १०७ धावा केल्या असून त्यांची एकूण आघाडी १७१ धावांची झाली आहे. पश्चिम विभागाकडून शम्स मुलानीने ३४ धावांत २ आणि तनुष कोटियनने २२ धावांत २ गडी बाद केले. सध्या आयुष बदोनी ३९, तर कर्णधार कन्हैया वाधवान ८ धावांवर नाबाद खेळत आहेत.
दुसऱ्या लढतीत पूर्व विभागाच्या ४६७ धावांच्या प्रत्युत्तरात इशान्य विभागाचा पहिला डाव १११ धावांत आटोपला. मग दुसऱ्या डावात फॉलोऑन लादल्यावर त्यांनी दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद ७ धावा केल्या आहेत.