पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान चाहत्यांना मद्यपानास बंदी!

फक्त व्हीआयपी पास असणाऱ्यांनाच स्टेडियममध्ये दारू मिळणार; आयोजकांचा अजब निर्णय
पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान चाहत्यांना मद्यपानास बंदी!

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकसाठी आता अवघा वर्षभराचा अवधी शिल्लक असताना काही चाहत्यांसाठी मात्र निराशाजनक बातमी समोर आली आहे. आयोजकांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सामान्य चाहत्यांना मद्यपान करण्यापासून मनाई केली आहे. फक्त हॉस्पिटॅलिटी तसेच व्हीआयपी बॉक्सेसचे पास असणाऱ्यांनाच स्टेडियममध्ये दारू पिण्याची परवानगी असेल.

पुढील वर्षी २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान ऑलिम्पिक रंगणार असून यामध्ये जगभरातील जवळपास १० हजार क्रीडापटू सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यामुळे पुढील वर्षी चाहत्यांच्या साक्षीने ऑलिम्पिक पुन्हा धुमाकूळ घालेल, असे अपेक्षित आहे. २०२१मध्ये कोरोनामुळे चाहत्यांविनाच ऑलिम्पिक पार पडले. त्यापूर्वी २०१२मध्ये लंडन, तर २०१६मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये चाहत्यांना स्टेडियममध्ये मद्यपान करण्याची परवानगी होती.

मात्र फ्रान्स शासनाच्या नव्या नियम व कायद्यांनुसार सार्वजनिक ठिकाणी सामान्य नागरिकांना मद्यपान करण्यास बंदी आहे. फक्त निवडक संख्येतील नागरिकांनाच मद्यपानाची परवानगी देण्यात आली आहे. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार फ्रान्स शासनाने कायद्यात काही बदल न केल्यास चाहत्यांना स्टेडियममध्ये मद्यपानासह सामन्यांचा आस्वाद लुटता येणार नाही.

कतारचा कित्ता गिरवला

गतवर्षी झालेल्या फुटबॉल विश्वचषकामध्ये फिफाने कतारच्या सर्व स्टेडियममध्ये मद्यपान विक्री तसेच दारूचे सेवन करण्यास मनाई केली होती. फ्रान्स शासनाने यावर्षी होणाऱ्या रग्बी विश्वचषकासाठी हा नियम लागू केला आहे. तसेच पुढील वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्येही त्यांनी हाच निर्णय कायम राखायचा आहे. २०२२मध्ये फ्रान्समध्येच झालेल्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत मात्र चाहत्यांना सायंकाळी ६ वाजल्यापासून (सामन्याच्या दोन तासांपूर्वी) ते सामना संपेपर्यंत स्टेडियममध्ये मद्यपान करण्याची परवानगी देण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in