

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी (Dwarkanath Sanzgiri) यांचे आज गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. ते 74 वर्षांचे होते. संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.
सिव्हिल इंजिनिअर द्वारकानाथ संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत होते. त्याचवेळी त्यांनी 'क्रिकेट समीक्षक' म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी 1983 मध्ये भारताने जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकापासून अनेक स्पर्धांचं वार्तांकन केले होते. क्रिकेट विश्वातील घडामोडी, गाजलेले सामने, क्रिकेटपटूंचे किस्से, खेळाडूंच्या विविध ऐतिहासिक खेळी याबद्दल त्यांचे लेखन वाचकांना क्रीडाविश्वाची भूरळ घालत असे. द्वारकानाथ यांनी स्तंभलेखनाव्यतिरिक्त चित्रपट, क्रीडा, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या निधनाने क्रिकेट समीक्षण क्षेत्र तसेच मराठी साहित्यात एक पोकळी निर्माण झाली आहे.
उद्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी (दि. 7) दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तोपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राज्याचे वाहतूक मंत्री यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, '' साहित्याच्या विविध प्रकारातून क्रिकेट जगताची ओळख प्रत्येक क्रिकेटप्रेमी व्यक्तीला करून देणारे प्रख्यात क्रिकेट समीक्षक, लेखक आणि सूत्रसंचालक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने क्रिकेट समीक्षण क्षेत्रातील एक तारा निखळून गेला. स्व. द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.''
क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी म्हटले, ''द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. ३८ वर्षांचा मित्र, इतक्या सामायिक आठवणी आणि इतक्या सौंदर्याने, शैलीने आणि रंगाने लिहिणारा असा एक माणूस. एखाद्या गोष्टीचे प्रत्यक्ष चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभे राहील असे त्यांचे लेखन होते.''