Duleep Trophy : पूर्व विभागाचा १३ वर्षांनी दुलीप ट्रॉफीवर कब्जा

इशान किशनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पूर्व विभागाने अखेर १३ वर्षांनी दुलीप ट्रॉफीवर कब्जा केला.
Duleep Trophy : पूर्व विभागाचा १३ वर्षांनी दुलीप ट्रॉफीवर कब्जा
Duleep Trophy : पूर्व विभागाचा १३ वर्षांनी दुलीप ट्रॉफीवर कब्जा(Photo-X/@airnewsalerts)
Published on

चेन्नई : इशान किशनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पूर्व विभागाने अखेर १३ वर्षांनी दुलीप ट्रॉफीवर कब्जा केला. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पूर्व विभागाने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर दक्षिण विभागाल नमवले.

अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवशी पूर्व विभागाने दुसऱ्या डावात ७ बाद ३८८ धावांपर्यंत मजल मारत आपली एकूण आघाडी ७६० धावांवर नेली आणि सामना अनिर्णित सुटला. पूर्व विभागाकडून खेळताना मोहम्मद कुरेशीने नाबाद ११६ धावा करत आपल्या अवघ्या दुसऱ्या प्रथम श्रेणी सामन्यात पहिले शतक झळकावले. त्याने अनुकुल रॉय (६४) याच्यासोबत सातव्या गड्यासाठी १५० धावांची भागीदारी रचली. कुरेशीने डावखुरा वेगवान गोलंदाज सी. व्ही. मिलिंद याच्या गोलंदाजीवर दोन धावा घेत १७९ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. दुपारी २.१० वाजता सामना अनिर्णित संपण्यापूर्वीच पूर्व विभागाने पहिल्या डावात ७०८ धावांचा डोंगर उभारात ३७२ धावांची भक्कम आघाडी घेतली होती, ज्या आधारे त्यांच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.

पाचव्या दिवशी ५ बाद २१२ धावसंख्येवरून पुढे खेळताना किशनच्या नेतृत्वाखालील पूर्व विभागाच्या फलंदाजांना दक्षिण विभागाच्या गोलंदाजांनी कोणतीही अडचण निर्माण केली नाही. दक्षिण विभागाकडून मोहम्मद सिराजने वेग आणि अचूकतेने मारा केला, परंतु त्याला दुसऱ्या टोकाने इतर गोलंदाजांची साथ मिळाली नाही. दक्षिण विभागाच्या संघ निवडीतील त्रुटीही या सामन्यात स्पष्टपणे दिसून आल्या, जिथे फॉर्मात असलेल्या करुण नायर, मयंक अगरवाल आणि साई किशोर यांसारख्या खेळाडूंना वगळण्यात आले होते.

किशनची दुहेरी चमक

याउलट पूर्व विभागाच्या अनेक खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. कर्णधार किशनने पहिल्या डावात २७० धावांची तडाखेबंद खेळी केली. आपल्या १००व्या प्रथम श्रेणी सामन्यात खेळणाऱ्या अनुभवी मोहम्मद शमी यानेही उत्कृष्ट गोलंदाजी केली. याशिवाय कुमार कुशाग्र याने प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले, तर त्याचा झारखंडमधील सहकारी शिखर मोहन याने अर्धशतकी योगदान दिले. “जेव्हा तुम्ही संघाचे नेतृत्व करता, तेव्हा परिस्थितीचे भान असणे सर्वात महत्त्वाचे असते. आम्ही जवळपास दोन दिवस फलंदाजी केली होती. त्यामुळे पहिल्या डावात १० बळी घेऊन भक्कम आघाडी मिळवणे हेच आमचे प्राथमिक ध्येय होते. एकदा मोठी आघाडी मिळाल्यानंतर कडक उन्हात पुन्हा मैदानात उतरण्याची आमची इच्छा नव्हती,” असे विजयानंतर किशन म्हणाला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in