तीन स्थानांसाठी आठ संघांत चुरस; महिलांच्या ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेला आजपासून प्रारंभ

जागतिक क्रमवारीत भारतीय महिला संघ सहाव्या स्थानी आहे. अमेरिकेविरुद्ध झालेल्या १५ सामन्यांपैकी भारताने फक्त ४ लढती जिंकल्या आहेत.
तीन स्थानांसाठी आठ संघांत चुरस; महिलांच्या ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेला आजपासून प्रारंभ

रांची : घरच्या मैदानावर खेळण्यासह प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा पूरेपूर लाभ उचलत भारतीय महिला हॉकी संघाला पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. महिलांच्या एफआयएच ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ होणार असून गोलरक्षक सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची सलामीच्या लढतीत अमेरिकेशी गाठ पडणार आहे. रांची येथील जयपाल सिंग स्टेडियमवर उभय संघ आमनेसामने येतील.

२०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. तसेच २०२१च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाला कांस्यपदकाने हुलकावणी दिली होती. हे अपयश बाजूला सारून आता नव्या वर्षात नव्या दमाने सुरुवात करण्यासाठी भारतीय महिला आतुर आहेत. जॅनेक शॉपमन यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा ब-गटात समावेश करण्यात आला असून त्यांना अनुक्रमे अमेरिका, न्यूझीलंड व इटलीशी दोन हात करायचे आहेत. अ-गटात जर्मनी, जपान, चेक प्रजासत्ताक, चिली हे चार संघ आहेत. या आठ संघांपैकी तीन म्हणजेच अंतिम फेरीतील दोन व तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीतील विजेता संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहे.

जागतिक क्रमवारीत भारतीय महिला संघ सहाव्या स्थानी आहे. अमेरिकेविरुद्ध झालेल्या १५ सामन्यांपैकी भारताने फक्त ४ लढती जिंकल्या आहेत. ९ सामन्यांत अमेरिकेने बाजी मारली आहे, तर २ सामने बरोबरीत सुटले आहेत. त्यातच अनुभवी आक्रमणपटू वंदना कटारिया दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकणार असल्याने भारतापुढील अडचणींत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच वंदना ही ३०० सामने खेळणारी पहिली भारतीय महिला हॉकीपटू ठरली होती. वंदनाच्या अनुपस्थितीत लालरेमसियामी, संगीता कुमारी यांच्यावर भारताची भिस्त असेल. मधल्या फळीत व बचावात सलिमा टेटे, नवनीत कौर यांच्याकडून भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

दरम्यान, भारतीय पुरुष संघाने २०२३मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून थेट पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले आहे. त्यामुळे आता फक्त महिलांवरच अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे.

logo
marathi.freepressjournal.in