रायबाकिनाला जेतेपद; आर्यना सबालेंकाचा झंझावात रोखला; ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावणारी कझाकस्तानची पहिली टेनिसपटू

जगातील अव्वल क्रमांकाची खेळाडू तसेच प्रथम मानांकित आर्यना सबालेंका हिचा झंझावात रोखत कझाकस्तानच्या एलेना रायबाकिना हिने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावणारी ती कझाकस्तानची पहिली टेनिसपटू ठरली आहे.
रायबाकिनाला जेतेपद; आर्यना सबालेंकाचा झंझावात रोखला; ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावणारी कझाकस्तानची पहिली टेनिसपटू
Photo : X
Published on

मेलबर्न : जगातील अव्वल क्रमांकाची खेळाडू तसेच प्रथम मानांकित आर्यना सबालेंका हिचा झंझावात रोखत कझाकस्तानच्या एलेना रायबाकिना हिने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावणारी ती कझाकस्तानची पहिली टेनिसपटू ठरली आहे.

२०२२मध्ये विम्बल्डन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावणाऱ्या रायबाकिनाचे हे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या रायबाकिनाने धडाकेबाज खेळ करत सबालेंकाला ६-४, ४-६, ६-४ अशी धूळ चारत जेतेपदावर नाव कोरले. २०२३च्या अंतिम फेरीत सबालेंकाने रायबाकिनाला पराभूत केले होते, त्याचा वचपा रायबाकिनाने यावेळी घेतली. रॉड लिव्हर एरिनावर रंगलेल्या अंतिम सामन्यात २६ वर्षीय रायबाकिनाना जेतेपदासाठी २ तास १८ मिनिटे संघर्ष करावा लागला. २००१ आणि २००२मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणारी जेनिफर कॅप्रियाती हिच्या हस्ते रायबाकिनाला गौरवण्यात आले.

रायबाकिनाने एकही सेट न गमावता ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. विम्बल्डन २००८नंतर आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धेत २००४नंतर एकही सेट न गमावता अंतिम फेरी गाठणारी रायबाकिना ही पहिली महिला टेनिसपटू ठरली.

“जेतेपद पटकावल्यानंतर माझ्या हृदयाचे ठोके अचानक वाढले आहेत. भलेही माझ्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव दिसत नसतील, मात्र आतमध्ये खूपच खळबळ माजली आहे. संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ केला असल्यामुळे विजेतेपद जिंकण्याची ही नामी संधी आहे, याची मला कल्पना होती. त्यामुळेच मी आक्रमक खेळावर भर देत कडवा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याचेच फळ मला मिळाले,” असे रायबाकिनाने जेतेपदानंतर सांगितले.

पहिल्या गेममध्येच सबालेंकाची सर्व्हिस भेदून रायबाकिनाने पहिला सेट आपल्या नावावर केला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये चांगला खेळ करता न आल्यामुळे सबालेंकाने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये रायबाकिना ०-३ अशा पिछाडीवर पडली होती. त्यामुळे सबालेंका नेहमीच्याच थाटात विजेतेपद पटकावेल, असे तमाम टेनिस चाहत्यांना वाटत होते. मात्र हार मानणार ती रायबाकिना कसली. तिने कडवी झुंज देत पुढील पाच गेम जिंकून सामन्यात पुनरागमन केले. त्यानंतर पुन्हा एकदा सबालेंकाची सर्व्हिस मोडीत काढत रायबाकिनाने तिसरा सेट जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

रायबाकिना ही मॉस्कोमध्ये जन्मलेली असली तरी ती कझाकस्तानचे प्रतिनिधित्व करत आहे. सबालेंकासाठी मात्र सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत पराभवाचा धक्का होता. गेल्या वर्षी तिला मॅडिसन कीज हिच्याकडून उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

logo
marathi.freepressjournal.in