Sania Mirza : सानियाचे स्वप्न अपुरेच; ग्रँडस्लॅम हुकल्याने अश्रूंचा फुटला बांध

भारतीय दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झाचा (Sania Mirza) मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने ग्रँडस्लॅमसह निवृत्ती घेण्याचे स्वप्न हुकले
Sania Mirza : सानियाचे स्वप्न अपुरेच; ग्रँडस्लॅम हुकल्याने अश्रूंचा फुटला बांध
Published on

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचे (Sania Mirza) शेवटचे ग्रँडस्लॅम मिळवण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. तीने रोहन बोपण्णाच्या (Rohan Bopanna) साथीने ऑस्ट्रेलिया ओपनमधील मिश्र दुहेरी (Australian Open Mixed Doubles championship) प्रकारात अंतिम सामन्यात धडक मारली होती. ही तिची शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. अंतिम फेरी गाठल्याने संपूर्ण भारताला आशा होती की ती तिच्या कारकिर्दीचा शेवट ग्रँडस्लॅम जिंकून करेल. मात्र, अंतिम सामन्यात पराभव झाल्याने सानियाला ते सध्या करता आले नाही. यावेळी मनोगत व्यक्त करताना तिलाही अश्रू अनावर झाले.

या सामन्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना भावुक होऊन ती म्हणाली की, "ही माझी शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. ग्रँडस्लॅममध्ये मी माझ्या मुलासमोर खेळेन, अशी कधी कल्पनाही केली नव्हती. मी माझ्या कारकीर्दीची सुरूवात २००५ मध्ये याच मेलबर्नमधून केली होती. त्यामुळे शेवटचे ग्रँडस्लॅम खेळण्यासाठी यापेक्षा चांगले मैदान दुसरे कोणतेच असू शकत नाही. मला इथे दिलेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे." असे म्हणताना तिला अश्रू अनावर झाले.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या जोडीचा ब्राझीलच्या लुईसा स्टेफनी आणि राफेल मॅटोस यांनी पराभव केला. त्यांनी ७-६, ६-२ अशा फरकाने या भारतीय जोडीचा पराभव केला. दरम्यान, सानिया मिर्झाने सोशल मीडियावर निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. १९ फेब्रुवारीपासून दुबईमध्ये होणारी डब्ल्यूटीए १० स्पर्धा ही तिची शेवटची स्पर्धा असल्याचे सांगण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in