T20 WC 2024, ENG vs IND: लक्ष्य - वचप्याचे आणि अंतिम फेरीचे! थाटात फायनलमध्ये जाण्याची भारताला सुवर्णसंधी

T20 WC 2024: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ गुरुवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यासाठी गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमच्या मैदानात उतरेल, तेव्हा त्यांच्यापुढे एकच लक्ष्य असेल ते म्हणजे अंतिम फेरीचे.
T20 WC 2024, ENG vs IND: लक्ष्य - वचप्याचे आणि अंतिम फेरीचे! थाटात फायनलमध्ये जाण्याची भारताला सुवर्णसंधी
Twitter

गयाना : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ गुरुवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यासाठी गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमच्या मैदानात उतरेल, तेव्हा त्यांच्यापुढे एकच लक्ष्य असेल ते म्हणजे अंतिम फेरीचे. इंग्लंडनेच २०२२च्या टी-२० विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत धूळ चारून पुढे स्पर्धाही जिंकली होती. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा घेण्यासह थाटात अंतिम फेरीत धडक मारण्याची भारताला सुवर्णसंधी आहे. मात्र या लढतीवर पावसाचे सावट असेल.

प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली अखेरची स्पर्धा खेळणारा भारतीय संघ अद्याप अपराजित आहे. साखळीत ३ सामने जिंकल्यानंतर भारताने सुपर-८ फेरीत अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांना नेस्तनाबूत केले. सांघिक कामगिरी भारताच्या यशाचे गमक आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करणारा भारतीय संघ व सध्याच्या संघात फार बदल झाला आहे. यंदा भारताला आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याची उत्तम संधी असून ते इंग्लंडला कमी लेखणार नाहीत.

दुसरीकडे जोस बटलरच्या इंग्लंडने साखळीत संघर्ष केला. सुपर-८ फेरीतही त्यांना आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र वेस्ट इंडिज आणि अमेरिका या संघांना त्यांनी एकतर्फी नामोहरम करून दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली. गेल्या चारही टी-२० विश्वचषकात इंग्लंडने उपांत्य फेरी गाठलेली आहे. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात त्यांचा भारताने दारुण पराभव केला होता. त्यामुळे इंग्लंडही त्या पराभवाची परतफेड करण्यासह सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यास आतुर आहे.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज

> गयानाच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणे लाभदायी ठरले असून येथे फिरकीपटूंना अधिक सहाय्य लाभते. येथे १५० धावांचा पाठलाग करणे कठीण जाते.

> गयाना येथील वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता ही लढत सुरू होणार आहे. मात्र सकाळी १० वाजल्यापासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दुपारी १च्या सुमारासही पावसाचे सावट आहे. जर पावसामुळे दुसऱ्या डावांतील १० षटकांपर्यंतचा खेळही शक्य न झाल्यास भारतीय संघाने सुपर-८ फेरीत त्यांच्या गटात अग्रस्थान मिळवल्याने ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

बटलर, सॉल्ट, रशिदपासून सावध

इंग्लंडची सलामी जोडी बटलर व फिल सॉल्ट यांच्यापासून भारताला सावध रहावे लागेल. गेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडचा एकही फलंदाज बाद करता आला नव्हता. त्यामुळे यंदा इंग्लंडचे फलंदाज विरुद्ध भारताचे गोलंदाज यांच्यातील जुगलबंदी पाहण्यास मजा येईल. गोलंदाजीत फिरकीपटू आदिल रशिद इंग्लंडसाठी हुकमी एक्का ठरू शकतो. त्याशिवाय जोफ्रा आर्चर व गेल्या लढतीत हॅट्‌ट्रिक मिळवणारा ख्रिस जॉर्डन यांची वेगवान जोडी इंग्लंडसाठी छाप पाडत आहे. मोईन अली व लियाम लिव्हिंगस्टोन यांचे फिरकी पर्यायही इंग्लंडकडे उपलब्ध आहेत.

विराटकडे लक्ष; रोहित लयीत

साहजिकच या संपूर्ण स्पर्धेत चर्चेचा मुद्दा राहिलेला भारताचा सलामीवीर विराट कोहली पुन्हा चाहत्यांच्या केंद्रस्थानी असेल. विराटने या स्पर्धेत ६ सामन्यांत फक्त ६६ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताच्या सलामीवीरांनी अद्याप एकदाही अर्धशतकी सलामीसुद्धा नोंदवलेली नाही. कर्णधार रोहितने मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४१ चेंडूंत ९२ धावांची तुफानी खेळी साकारून प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला. विराट व रोहित यांच्याकडून चाहत्यांना आता मोठी भागीदारी अपेक्षित आहे. त्याशिवाय सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या यांनीही फलंदाजीत सातत्याने छाप पाडली आहे. शिवम दुबेकडून मधल्या षटकांत फटकेबाजी अपेक्षित आहे.

बुमरा, कुलदीप, अर्शदीप यांच्यावर मदार

जसप्रीत बुमरा यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत मोक्याच्या क्षणी भारतासाठी धावून आला आहे. त्याने ६ सामन्यांत ११, तर डावखुऱ्या अर्शदीपने सिंगने भारताकडून सर्वाधिक १५ बळी मिळवले आहेत. त्याशिवाय फिरकीपटू कुलदीप यादव गयानाच्या खेळपट्टीवर प्रभावी ठरू शकतो. त्याला अक्षर पटेल व रवींद्र जडेजा यांच्याकडून साथ अपेक्षित आहे. हार्दिकही अष्टपैलू योगदान देत आहे. ८ जून रोजी विंडीज-युगांडा लढत याच मैदानावर झाली होती. त्यावेळी विंडीजच्या फिरकीपटू अकील होसेनने पाच बळी पटकावले होते. त्यानंतर प्रथमच या मैदानात लढत होईल.

१२-११

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या २३ टी-२० सामन्यांत भारताने १२, तर इंग्लंडने ११ लढती जिंकल्या आहेत. तसेच टी-२० विश्वचषकात उभय संघ पाचव्यांदा आमनेसामने येणार असून यापूर्वीच्या ४ लढतींपैकी भारताने २, तर इंग्लंडनेसुद्धा २ सामने जिंकले आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

> भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

> इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टली, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशिद, फिल सॉल्ट, रीस टॉप्ली, मार्क वूड.

> वेळ : रात्री ८ वाजल्यापासून

> थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि हॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in