इंग्लंडसमोर लंकेची शरणागती; श्रीलंकेवर ५१ धावांनी दणदणीत विजय; जोफ्रा आर्चर, विल जॅक्सची दमदार गोलंदाजी

ENG VS SL T20 WC26 : वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि फिरकीपटू विल जॅक्स यांची दमदार कामगिरी तसेच फिल सॉल्टच्या ६२ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत लोळवले.
इंग्लंडसमोर लंकेची शरणागती; श्रीलंकेवर ५१ धावांनी दणदणीत विजय; जोफ्रा आर्चर, विल जॅक्सची दमदार गोलंदाजी
इंग्लंडसमोर लंकेची शरणागती; श्रीलंकेवर ५१ धावांनी दणदणीत विजय; जोफ्रा आर्चर, विल जॅक्सची दमदार गोलंदाजी
Published on

पल्लिकेल : वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि फिरकीपटू विल जॅक्स यांची दमदार कामगिरी तसेच फिल सॉल्टच्या ६२ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत लोळवले.

डावखुरा फिरकीपटू दुनिथ वेलालागे याने (३ विकेट्स) अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडला ९ बाद १४६ धावांवर रोखले होते. श्रीलंकेने पहिल्या टप्प्यात खेळावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले होते. मात्र फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे श्रीलंकेचा डाव १६.४ षटकांत ९५ धावांवर संपुष्टात आणत इंग्लंडने ५१ धावांनी विजय साकारला.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडलाही चांगली सुरुवात करता आली नाही. सुपर-८ फेरीत आक्रमक खेळी करण्याचे कर्णधार हॅरी ब्रूकचे मनसुबे श्रीलंकेने उधळून लावले. जोस बटलर (७) आणि जेकब बेथेल (३) स्वस्तात माघारी परतल्यामुळे इंग्लंडला पहिल्या पॉवर-प्लेमध्ये ६ षटकांत फक्त २ बाद ३७ धावा करता आल्या. टॉम बँटन (६) आणि हॅरी ब्रूक (१४) यांनाही छाप पाडता आली नाही. सलामीवीर फिल सॉल्ट एका बाजूने आक्रमक खेळी करत असताना त्याला दुसरीकडून फलंदाजांची साथ लाभत नव्हती. त्यामुळेच इंग्लंडची १० षटकाांत ४ बाद ६८ अशी अवस्था झाली होती. सॉल्टने ३६ चेंडूंत अर्धशतक साजरे केले. मात्र वेलालागेने त्याची खेळी ६ चौकार आणि २ षटकारांसह ६२ धावांवर संपुष्टात आणली.

इंग्लंडचे १४७ धावांचे आव्हान पार करताना श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी सपेशल निराशा केली. पाथूम निसांका (९), कुशल मेंडिस (४), पवन रथनायके (०) आणि कमिल मिशारा (६) तसेच दुनिथ वेलालागे (१०) यांनी लवकरच पॅव्हेलियनची वाट धरली. त्यामुळे ६ षटकांत श्रीलंका संघ ५ बाद ३४ अशा बिकट अवस्थेत होता. कर्णधार दासून शनाका आणि कामिंडू मेंडिस (१०) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. शनाकाने २४ चेंडूंत १ चौकार आणि २ षटकारांसह ३० धावा केल्या. मात्र अन्य फलंदाजांची साथ न लाभल्यामुळे श्रीलंकेला शतकी धावसंख्याही पार करता आली नाही. इंग्लंडकडून विल जॅक्सने तीन तर आर्चर, लियाम डॉसन आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवले.

logo
marathi.freepressjournal.in