ब्रॉडला संस्मरणीय विजयी निरोप ; पाचव्या कसोटीत इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर ४९ धावांनी सरशी

पाचव्या दिवसातील अखेरच्या सत्रापर्यंत रंगलेल्या पाचव्या अॅशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ४९ धावांनी विजय मिळवून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.
ब्रॉडला संस्मरणीय विजयी निरोप ; पाचव्या कसोटीत इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर ४९ धावांनी सरशी

लंडन : कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळणाऱ्या तारांकित वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेच (६२ धावांत २ बळी) ऑस्ट्रेलियाचा शेवटचा बळी मिळवला आणि इंग्लंडच्या संस्मरणीय विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. पाचव्या दिवसातील अखेरच्या सत्रापर्यंत रंगलेल्या पाचव्या अॅशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ४९ धावांनी विजय मिळवून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. यामुळे इंग्लंडचे खेळाडू ब्रॉडला विजयी निरोप देण्यात यशस्वी ठरले. तसेच फिरकीपटू मोईन अलीनेसुद्धा कसोटी प्रकारातून पुन्हा एकदा निवृत्ती जाहीर केली.

ओव्हल येथे झालेल्या या कसोटीतील दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियापुढे ३८४ धावांचे लक्ष्य होते. एकवेळ बिनबाद १४० अशा भक्कम स्थितीत असतानाही ब्रॉड, ख्रिस वोक्स (५० धावांत ४ बळी), अली (७६ धावांत ३ बळी) यांच्यापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ ३३४ धावांत गारद झाला. विशेष म्हणजे उपहाराला ऑस्ट्रेलियाची ३ बाद २३८ अशी स्थिती होती. पावसामुळे दुसरे सत्र संपूर्ण वाया गेले. त्यावेळी स्टीव्ह स्मिथ व ट्रेव्हस हेड यांची जोडी मैदानावर होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया अखेरच्या सत्रात १४६ धावा करून इंग्लंडसह ब्रॉडचा हिरमोड करणार, असे वाटले. मात्र तिसऱ्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी सर्वस्व पणाला लावत ऑस्ट्रेलियाला रोखले.

अलीने हेडला (४३) बाद करून चौथ्या विकेटची ९५ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने चार षटकांत चार फलंदाज गमावले. वोक्सने स्मिथ (५४), मिचेल स्टार्कचा अडसर दूर केला. मिचेल मार्शचा (६) जॉनी बेअरस्टोने उत्तम झेल टिपला. कर्णधार पॅट कमिन्सही (९) यावेळी लवकर माघारी परतला. ८ बाद २९४ धावांवरून टॉड मर्फी व अॅलेक्स कॅरी यांनी झटपट ३५ धावा केल्या. त्यावेळी कर्णधार बेन स्टोक्सने ब्रॉडकडे चेंडू सोपवला. ब्रॉडने प्रथम मर्फीला (१८), तर तीन षटकांनतर कॅरीलासुद्धा अप्रतिम चेंडूवर जाळ्यात अडकवून इंग्लंडचा विजय साकारला. कॅरीला बाद केल्यानंतर ब्रॉड नेहमीच्या शैलीत विमानाप्रमाणे हात लांब करून धावत सुटला व सर्व सहकाऱ्यांसह स्टेडियममधील इंग्लंडच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

३७ वर्षीय ब्रॉडने १६७ कसोटींमध्ये ६०४ बळी मिळवले, तर अलीने ६८ कसोटींत २०४ बळी टिपण्याची किमया साधली. कसोटीत ३६ धावा करण्यासह एकूण ७ बळी मिळवणारा वोक्स सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याशिवाय मालिकेत २३ बळी टिपणारा मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. तर इंग्लंडचा मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार वोक्सलाच देण्यात आला. त्याने ३ कसोटींत १९ बळी मिळवतानाच ७९ धावाही केल्या. जो रूट इंग्लंडच्या उन्हाळी घरगुती हंगामातील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

ब्रॉडचा असाही कारनामा

- ब्रॉडने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ८ चेंडूंत नाबाद ८ धावा केल्या. यादरम्यान त्याने ८१व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर षटकार लगावला.

- हाच त्याचा फलंदाज म्हणून कारकीर्दीतील अखेरचा चेंडू ठरला. कारण पुढच्याच षटकात जेम्स अँडरसनच्या रूपात इंग्लंडचा १०वा फलंदाज बाद झाला.

- त्यानंतर गोलंदाजीदरम्यान ब्रॉडनेच अॅलेक्स कॅरीला बाद करून ऑस्ट्रेलियाचा शेवटचा बळी मिळवला.

- कारकीर्दीतील अखेरच्या कसोटीत फलंदाजीदरम्यान शेवटच्या चेंडूवर षटकार, तर गोलंदाजीच्या वेळी अखेरच्या चेंडूवर बळी मिळवणारा ब्रॉड हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला.

युवराजच्या त्या सहा षटकारांमुळे घडलो!

आज मी गोलंदाज म्हणून जे काही साध्य केले आहे, त्यामागे २००७मध्ये युवराज सिंगने माझ्याविरुद्ध लगावलेल्या सहा षटकारांचे मोठे योगदान आहे, अशी कबुली ब्रॉडने दिली. २००७च्या टी-२० विश्वचषकात भारत-इंग्लंड यांच्यातील लढतीत युवराजने ब्रॉडला सलग सहा षटकार लगावले होते. त्यावेळी ब्रॉड २१ वर्षांचा होता. “कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात हा एक कटू धडा होता आणि यामुळे एक स्पर्धात्मक खेळाडू बनण्यास मदत झाली. चांगल्या लोकांना क्रिकेटमध्ये काहीतरी करून दाखवण्यासाठी वाईट दिवस तसेच खराब कामगिरीतूनही जावे लागते, हे त्यामुळे समजले. माझ्या गोलंदाजीत खरी सुधारणा तेथूनच झाली,” असे ब्रॉड म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in