इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर आठ धावांनी विजय;ॲलेक्स हेल्स सामनावीर

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवर कॅमेरून ग्रीन दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बाद झाला
इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर आठ धावांनी विजय;ॲलेक्स हेल्स सामनावीर

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा आठ धावांनी पराभव करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. विजयासाठी २०९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला निर्धारित षटकात ९ बाद २०० धावांपर्यंतच मजल मारता आली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (४४ चेंडूंत ७३) केलेले विजयाचे प्रयत्न निष्फळ ठरले. ५१ चेंडूंत ८४ धावा करणाऱ्या आणि दोन अप्रतिम झेल टिपणाऱ्या ॲलेक्स हेल्सला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवर कॅमेरून ग्रीन दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बाद झाला. टॉपलेने त्याला बटलरच्या हाती सोपविले. त्याला दोन चेंडूंत अवघी एक धाव काढता आली. दुसरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने १७ षटकांपर्यंत किल्ला लढविला. परंतु दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळू न शकल्याने त्याचे प्रयत्न तोकड पडले. वॉनर्रला मार्क वूडने हेल्समार्फत झेलबाद केले आणि कांगारूंच्या विजयाच्या आशा मावळल्या. मिचेल मार्श (२६ चेंडूंत ३६) आणि मार्कस स्टोईनिस (१५ चेंडूंत ३५) यांनीही बऱ्यापैकी दिलेली झुंज निष्फळ ठरली.

त्याआधी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार फटकेबाजी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल १३२ धावांची भागीदारी केली. या दोघांनी मिळून २० चौकार आणि सात षटकारांची आतषबाजी केली. या दोघांच्या या भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने २० षटकात ८ बाद २०८ धावा केल््या.

बटलरने कॅमेरून ग्रीनच्या पहिल्याच षटकात दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारत १६ धावा वसूल केल्या. दुसऱ्या बाजूने अॅलेक्स हेल्सने रिचर्डसनला पहिल्याच चेंडूवर चौकार मारत आपले खाते उघडले. बटलर आणि हेल्स यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण करत पहिल्या ७ षटकात ७२ धावा फटकविल्या.

बटलरने २५ चेंडूत अर्धशतक झळकविले; तर हेल्सने २९ चेंडूत चौकार मारत आपले अर्धशतक साजरे केले. या दोघांनी पहिल्या १० षटकात ११८ धावा केल्या. ही सलामीची ही जोडी अखेर बाराव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर नॅथन एलिसने फोडली. त्याने बटलरला (३२ चेंडूंत ६८) धावांवर बाद केले. बटलरने ८ चौकार आणि ४ षटकार लगावले. रिचर्डसनने त्याचा झेल टिपला.

हेल्स शतक झळकविणार असे वाटत असतानाच सोळाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रिचर्डसनने टीम डेव्हिडमार्फत त्याला झेलबाद केले. हेल्सने ५१ चेंडूंत ८४ धावा करताना १२ चौकार आणि तीन षटकार लगावले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in