टीम इंडियाचा "हार्ट'ले'ब्रेक"! इंग्लंडची भारतावर २८ धावांनी मात; टॉम हार्टलेच्या सात विकेट्स

ऑली पोपच्या १९६ धावांच्या दमदार खेळीमुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात ४२० धावा उभारता आल्या.
टीम इंडियाचा "हार्ट'ले'ब्रेक"! इंग्लंडची भारतावर २८ धावांनी मात; टॉम हार्टलेच्या सात विकेट्स

हैदराबाद : हार्टलेब्रेक

सामन्यावर मिळवलेली पकड कशी सोडायची, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. पहिल्या डावात १९० धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतरही भारताची चौथ्या दिवशी भंबेरी उडाली. ऑली पोप याच्या १९६ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने यजमान भारतासमोर विजयासाठी २३१ धावांचे आव्हान ठेवले. मात्र युवा गोलंदाज टॉम हार्टलेच्या फिरकी माऱ्यासमोर भारताचा दुसरा डाव २०२ धावांवर संपुष्टात आणत इंग्लंडने २८ धावांनी विजय साकारला.

इंग्लंडचे २३१ धावांचे उद्दिष्ट पार करताना रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताला आश्वासक सुरुवात करून दिली. मात्र हार्टलेच्या फिरकी माऱ्यासमोर भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी सपेशल शरणागती पत्करली. त्यामुळे इंग्लंडला या मालिकेत १-० अशी आघाडी घेता आली. भारताचा हा २०१३नंतरचा कसोटी सामन्यातील मायदेशातील चौथा तर हैदराबादमधील पहिला पराभव ठरला.

ऑली पोपच्या १९६ धावांच्या दमदार खेळीमुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात ४२० धावा उभारता आल्या. पोपने रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या भारताच्या दोन्ही अव्वल फिरकीपटूंसमोर जबरदस्त फलंदाजी केली. खेळपट्टीकडून कोणतीही मदत मिळत नसताना, चौथ्या दिवशी मात्र टॉम हार्टलेने कमाल केली. हैदराबादच्या उप्पलच्या स्टेडियमवर खेळपट्टीकडून उपाहारानंतर मदत मिळू लागल्यानंतर हार्टलेने एकापाठोपाठ ‘हार्टब्रेक’ देण्यास सुरुवात केली. रोहित आणि जैस्वाल यांनी ४२ धावांची सलामी दिल्यानंतर हार्टलेच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या नादात जवळच उभ्या असलेल्या पोपच्या हातात जैस्वालने (१५) झेल दिला. त्यानंतरच्या दोन चेंडूंनंतर शुभमन गिलने (०) पुढ्यात उभ्या असलेल्या पोपकडे झेल देऊन पॅव्हेलियनचा रस्ता धरला.

लागोपाठच्या दोन धक्क्यांनंतर हार्टलेने कर्णधार रोहित शर्माला (३९) पायचीत पकडत भारताला ३ बाद ६३ अशा अडचणीत आणले. भारताने श्रेयस अय्यरऐवजी अक्षर पटेलला फलंदाजीत बढती दिली. पटेलने लोकेश राहुलसह भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अक्षर पटेलला (१७) हार्टलेने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. पाठोपाठ राहुलला (२२) इंग्लंडचा गोलंदाज जो रूटने पायचीत पकडले.

भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंसमोर चांगली कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या श्रेयस अय्यरकडून भारताला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तोसुद्धा (१३) जॅक लीचची शिकार ठरला. अष्टपैलू रवींद्र जडेजा (२) धावचीत होऊन माघारी परतला, तेव्हा भारताची ७ बाद ११९ अशी अवस्था झाली होती. मात्र त्यानंतर रवीचंद्रन अश्विन (२८) आणि श्रीकर भारत (२८) यांनी दमदार प्रतिकार केला. त्यांनी आठव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचत भारताला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण एकापाठोपाठ दोघेही बाद झाल्यावर तळाच्या मोहम्मद सिराजने १२ धावा फटकावत झुंज दिली. पण हार्टलेने त्यालाही यष्टीचीत करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

माझ्या नेतृत्वाखालील सर्वोत्तम विजय -स्टोक्स

जो रूटकडून कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर माझ्या नेतृत्वाखालील हा सर्वोत्तम विजय ठरला आहे. कर्णधार झाल्यानंतर मी पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आलो आहे, ते मैदानावर कसे वावरतात, याचे निरीक्षण मी करत असतो. टॉम हार्टलेचे एकूण ९ बळी आणि ऑली पोपने फटकावलेले दीडशतक हे या सामन्यात सर्वोत्तम ठरले, असे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला.

नेमके काय चुकले हे सांगणे कठीण -रोहित

पहिल्या डावात १९० धावांची आघाडी घेतल्यानंतर आम्ही सामन्यावर वर्चस्व मिळवले होते. मात्र ऑली पोपने दमदार फलंदाजी केली. भारतीय खेळपट्ट्यांवरील ही सर्वोत्तम खेळी आहे. मात्र भारताचे नेमके काय चुकले हे सांगणे कठीण आहे. २३० धावा फटकावणे अशक्य नव्हते. मात्र हे आव्हान पार करण्याइतपत आम्ही चांगली फलंदाजी केली नाही, हेच म्हणेन. तळाच्या फलंदाजांनी चांगला प्रतिकार केला. आघाडीच्या फलंदाजांनी काय करायला हवे होते, ते त्यांनी दाखवून दिले, असे भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in