
इंग्लंडने प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर येत न्यूजीलंडवर पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पाच गडी राखून विजय मिळविला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली. चौथ्या डावात इंग्लंडने विजयासाठीचे २७७ धावांचे लक्ष्य ७८.५ षट्कांत पाच बाद २७९ धावा करीत साध्य केले. नाबाद ११५ धावांची खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलणारा माजी कर्णधार जो रूटला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. रूटने या खेळीदरम्यान अनेक विक्रम केले. मालिकेतील दुसरा सामना १० जूनपासून नॉटिंघममध्ये खेळविण्यात येणार आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडने न्यूझीलंडचा डाव १३२ धावांत संपुष्टात आणला होता. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डावही १४१ धावात गडगडला होता. डॅरेल मिशेलच्या शानदार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात २८५ धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडला चौथ्या डावात २७७ धावा करण्याचे लक्ष्य मिळाले.