
लंडन : रवींद्र जडेजाचे शर्थीचे प्रयत्न अखेर वाया गेले. यजमान इंग्लंडने भारताला २२ धावांनी पराभूत करत मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतावर रोमहर्षक विजय मिळवला. तळातील जोडींनी केलेल्या संयमी फलंदाजीमुळे सामन्यात रंगत वाढली होती. कर्णधार बेन स्टोक्स आणि अनुभवी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांनी शानदार कामगिरी करत भारताला पराभवाचा चेहरा दाखवला. विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.
दिवसाची सुरुवात झाली तेव्हा भारताला विजयासाठी १३५ धावांची आवश्याकता होती, तर इंग्लंडला ६ बळी टिपायचे होते. इंग्लंडने सकाळच्या सत्रात चार भारतीय फलंदाजांना बाद करत सामन्यावर पकड मिळवली होती. परंतु शेवटच्या दोन सत्रांमध्ये भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत इंग्लंडचा धूर काढला. भारत १७० धावांवर सर्वबाद झाला.
आर्चर (३/५५) आणि स्टोक्स (३/४८) हे इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तर जडेजाने भारतासाठी झुंज देत नाबाद ६१ धावा केल्या.
रवींद्र जडेजाने (१८१ चेंडूंत नाबाद ६१ धावा) इंग्लंडच्या संघाला अक्षरश: रडवले. त्याने जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज यांच्यासोबत जवळपास तीन तास फलंदाजी केली. बुमराने ५४ चेंडूंत ५ आणि सिराजने ३० चेंडूंत ४ धावा केल्या.
चहापानापर्यंत भारतीय संघ १६३ धावांवर ९ फलंदाज बाद अशा स्थितीत होता. जडेजाने सलग चौथे अर्धशतक झळकावले. लंचपर्यंत भारताने ११२ धावांवर ८ विकेट गमावले होते. प्रमुख फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाने जसप्रीत बुमराच्या साथीने भारताला विजयाची आस दाखवली.
सकाळच्या सत्रात भारताची अननुभवी फलंदाजांची फळी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर अपयशी ठरली.
पहिल्या दोन कसोटींमध्ये भारताने शानदार फलंदाजी केली. मात्र तिसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारताची घसरगुंडी झाली.
१९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंचला जाण्याआधी स्ट्रोक्सच्या गोलंदाजीवर ख्रिस वोक्सने नितीश कुमार रेड्डीचा झेल टिपत भारताला अडचणीत टाकले. त्यावेळी ११२ धावांवर भारताने ८ फलंदाज गमावले होते. एका बाजूने फलंदाज बाद होण्याचे सत्र सुरू असताना जडेजा दुसऱ्या बाजूला तळ ठोकून होता. त्याने भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.
पाचव्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा भारताने ५८ धावांवर ४ फलंदाज गमावले होते. त्यावेळी भारताला १३५ धावांची आवश्यकता होती. खराब झालेल्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची कसोटी होती. ऋषभ पंत (१२ चेंडूंत ९ धावा), केएल राहुल (५८ चेंडूंत ३९ धावा) आणि वॉशिंग्टन सुंदर (४ चेंडूंत ० धावा) हे फलंदाज पहिल्या तासातच माघारी परतले.
राहुल आणि पंत ही जोडीवर भारताची फलंदाजी अवलंबून होती. मात्र १८ चेंडूंच्या अंतराने ही जोडी माघारी परतली. जोफ्रा आर्चरच्या वेगापुढे भारतीय फलंदाजांची धांदल उडाली. पंत आणि राहुल ही दुकली वेगवान गोलंदाजांच्या सापळ्यात अडकली.
पहिल्या दिवशी यष्टीरक्षण करताना पंतच्या बोटाला दुखापत झाली. मात्र तरीही तो फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आर्चरच्या सापळ्यात तो अडकला.
केएल राहुलने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला, पण स्टोक्सने अप्रतिम इनस्विंग टाकत त्याला माघारी धाडले. वॉशिंग्टन सुंदर केवळ चार चेंडूंत माघारी परतला. आर्चरने स्वतःच्या गोलंदाजीवर झेल टिपला.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड - ३८७ आणि १९२; भारत - ३८७ आणि १७० सर्वबाद ७४.५ षटकांत, केएल राहुल ३९, रवींद्र जडेजा नाबाद ६१; जोफ्रा आर्चर ३/५५, बेन स्टोक्स ३/४८)
परदेशात दुसरा सर्वात निसटता पराभव
लॉर्ड्स कसोटीत भारताचा २२ धावांनी पराभव झाला. परदेशातील मैदानात भारताचा हा दुसरा सर्वात जवळचा पराभव ठरला. याआधी १९७७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे १६ धावांनी भारताचा पराभव झाला होता.
लॉर्ड्सवर दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारा रवींद्र जडेजा हा भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी विनोद मंकडने १९५२ मध्ये लॉर्ड्सवर खेळताना पहिल्या डावात ७२ धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात १८४ धावांची खेळी खेळली होती. तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाने पहिल्या कसोटीत ७२ आणि दुसऱ्या कसोटीत नाबाद ६१ धावा केल्या आहेत.