पहिल्या दिवशीच इंग्लंडची दैना! भारताच्या फिरकी त्रिकुटापुढे पाहुण्यांचा डाव २४६ धावांत संपुष्टात

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर यशस्वीच्या साथीला शुभमन गिल १४ धावांवर खेळत आहे.
पहिल्या दिवशीच इंग्लंडची दैना! भारताच्या फिरकी त्रिकुटापुढे पाहुण्यांचा डाव २४६ धावांत संपुष्टात

हैदराबाद : अपेक्षेप्रमाणे भारताच्या फिरकीपटूंनी इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भारत-इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत रविचंद्रन अश्विन (६८ धावांत ३ बळी), रवींद्र जडेजा (८८ धावांत ३ बळी) आणि अक्षर पटेल (३३ धावांत २ बळी) यांनी पाहुण्यांचा डाव २४६ धावांतच गुंडाळला. त्यानंतर मुंबईकर यशस्वी जैस्वालच्या (७० चेंडूंत नाबाद ७६ धावा) आक्रमक अर्धशतकामुळे भारताने २३ षटकांत १ बाद ११९ धावांपर्यंत मजल मारून दमदार प्रारंभ केला.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर यशस्वीच्या साथीला शुभमन गिल १४ धावांवर खेळत आहे. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भर घातली असून भारतीय संघ अद्याप १२७ धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार रोहित शर्माच्या रूपात एकमे‌व गडी भारताने गमावला. २७ चेंडूंत ३ चौकारांसह २४ धावा करणाऱ्या रोहितला जॅक लीचने बाद केले. रोहित व यशस्वी या मुंबईकरांनी ७४ चेंडूंतच ८० धावांची सलामी नोंदवताना इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. यशस्वी ९ चौकार व ३ षटकारांसह कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक साकारून खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. त्यामुळे तो शतक साकारण्यासह भारताला आघाडी मिळवून देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने बॅझबॉल शैलीत धडाकेबाज सुरुवात केली. झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी ११.५ षटकांतच ५५ धावांची सलामी नोंदवली. अखेर अश्विनने डकेटला (३५) पायचीत पकडून पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर जडेजाने ओली पोपचा (१) अडथळा दूर केला. अश्विनच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने क्रॉलीचा (२०) अप्रतिम झेल पकडल्याने इंग्लंड ३ बाद ६० असा संकटात सापडला. तेथून जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडला सावरले.

या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचल्यावर अक्षरने दुसऱ्या सत्रात अफलातून चेंडूवर बेअरस्टोचा (३७) त्रिफळा उडवला. तीन षटकांच्या अंतरातच जडेजाने धोकादायक रूटला (२९) माघारी पाठवल्याने इंग्लंडचा डाव घसरला. बेन फोक्स (४) व रेहान अहमदही (१३) फार काळ टिकू शकले नाहीत. कर्णधार बेन स्टोक्सने मात्र एकाकी झुंज दिली. त्याने ८० चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ३१वे अर्धशतक साकारताना ७० धावा केल्या. स्टोक्सला टॉम हार्टली (२३), मार्क वूड (११) यांनी उपयुक्त साथ दिल्याने इंग्लंडने २०० धावांचा पल्ला गाठला. अखेर जसप्रीत बुमराने स्टोक्सला त्रिफळाचीत करून ६४.३ षटकांत २४६ धावांवर इंग्लंडच्या डावावर पूर्णविराम लावला. भारतासाठी अश्विनी, जडेजाने प्रत्येकी तीन, तर अक्षर व बुमराने प्रत्येकी दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड (पहिला डाव) : ६४.३ षटकांत सर्व बाद २४६ (बेन स्टोक्स ७०, जॉनी बेअरस्टो ३७; रविचंद्रन अश्विन ३/६८, रवींद्र जडेजा ३/८८)

भारत (पहिला डाव) : २३ षटकांत १ बाद ११९ (यशस्वी जैस्वाल नाबाद ७६, रोहित शर्मा २४, शुभमन गिल नाबाद १४; जॅक लीच १/२४)

आयसीसी जेतेपद लवकरच जिंकू -रोहित

गेल्या दशकभरापासून भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. मात्र भारतीय संघ त्यादृष्टीने योग्य ती मेहनत घेत असून लवकरच आम्ही आयसीसी स्पर्धा जिंकू, असा विश्वास भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला. पहिल्या कसोटीच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्याने या विषयावर भाष्य करतानाच भविष्याचा अधिक विचार न करता सध्या फक्त इंग्लंडविरुद्धच्या मालिकेवर आपले लक्ष्य असल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in