
इंग्लंड, न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना उत्कंठावर्धक स्थितीत आला असून इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सोमवारी शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत न्यूझीलंडची आघाडी १८६ धावांची झाली होती. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत ६० षट्कांत ४ बाद १७२ धावा केल्या होत्या. विल यंग (११३ चेंडूंत ५६) आणि डेव्हन कॉन्वे (१०९ चेंडूंत ५२) यांनी अर्धशतके झळकविली.
त्याआधी, न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ५५३ धावांना उत्तर देताना इंग्लंडचा डाव ५३९ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात १४ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. जो रुटने २११ चेंडूंत १७६ धावा केल्या. त्याने एक षट्कार आणि २६ चौकार लगावले.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने पाच गडी गमावून ४७३ धावा केल्या होत्या. ऑली पोपनेही शतक झळकाविले होते. १३ चौकार आणि तीन षट्कार लगावत त्याने १४५ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा इंग्लंड न्यूझीलंडपेक्षा ८० धावांनी पीछाडीवर होता.