तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला विजयासाठी २९६ धावांचे लक्ष

न्यूझीलंडचा पहिला डाव ३२९ धावांत संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ३६० धावा केल्या
तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला विजयासाठी २९६ धावांचे लक्ष

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी विजयासाठी २९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा इंग्लंडने २ बाद ५६ धावा केल्या होत्या. सलामीवीर ॲलेक्स लीस (१८ चेंडूंत ९) धावबाद झाला, तर झॅक क्रॉली (३३ चेंडूंत २५) झेलबाद झाला.

न्यूझीलंडचा पहिला डाव ३२९ धावांत संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ३६० धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात ३१ धावांची आघाडी मिळाली.

न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ३२६ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला २९६ धावांचे लक्ष्य मिळाले. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात उपाहारापर्यंत ८२ षट्कांत ५ बाद २५४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी डेरेल मिचेल आणि टॉम ब्लंडेल अनुक्रमे ४४ आणि ४५ धावांवर नाबाद होते.

मिचेलला ९१व्या षट्काच्या पाचव्या चेंडूवर मॅथ्यू पॉट‌्सने पायचीत केले. मिचेलने १५२ चेंडूंत ५६ धावा करताना नऊ चौकार लगावले.

ब्लंडेलने १६१ चेडूंना सामोरे जात १५ चौकारांसह नाबाद ८८ धावा केल्या. न्यूझीलंडच्या २०० धावा ३९५ चेंडूंत फलकावर लागल्या, तर २५० धावा ४७९ चेंडूंत झळकल्या. मायकेल ब्रेसवेल (१३ चेंडूंत ९), टीम साउथी (१२ चेंडूंत २), नील वॅगनर (५ चेंडूंत ०), ट्रेंट बोल्ट (८ चेंडूंत ४) यांना दुहेरी धावसंख्या गाठण्यात अपयश आले.

इंग्लंडकडून जॅक लिचने ६६ धावांच्या मोबदल्यात पाच विकेट्स घेतल्या. मॅथ्यू पॉट्सने ६६ धावांच्या मोबदल्यात तीन बळी टिपले. जेमी ओव्हरटन, जो रूट यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in