

लंडन : जानेवारी महिन्यात भारतीय संघाविरुद्ध होणारी एकदिवसीय तसेची टी-२० मालिका आणि मार्चमधील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी इंग्लंडच्या संघाने संघ जाहीर केले आहेत. अनुभवी जो रूटचे वर्षभरानंतर एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे.
२२ जानेवारीपासून भारत-इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येईल. अनुक्रमे कोलकाता (२२ जानेवारी), चेन्नई (२५ जानेवारी), राजकोट (२८ जानेवारी), पुणे (३१ जानेवारी), मुंबई (२ फेब्रुवारी) येथे टी-२० सामने होतील. त्यानंतर ६, ९ व १२ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे नागपूर, कटक व अहमदाबाद येथे भारत-इंग्लंड यांच्यात एकदिवसीय सामने खेळवण्यात येतील. त्यानंतर १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान व दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रंगणार आहे.
दरम्यान, अनुभवी जोस बटलर इंग्लंडच्या दोन्ही संघांचे नेतृत्व करणार असून बेन स्टोक्सचा दुखापतीमुळे टी-२० संघात समावेश करण्यात आलेला नाही. तसेच नोव्हेंबर २०२३मध्ये भारतातच विश्वचषकादरम्यान अखेरचा एकदिवसीय सामना खेळलेला रूट पुन्हा या प्रकारात इंग्लंडचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज आहे. रेहान अहमदला टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. हॅरी ब्रूक संघाचा उपकर्णधार असेल.
भारतात झालेल्या गेल्या एकदिवसीय विश्वचषकात इंग्लंडला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. तसेच २०२४च्या टी-२० विश्वचषकातही इंग्लंड उपांत्य फेरीत भारताकडून पराभूत झाला. आता बटलरच्या नेतृत्वाखाली काहीशा नव्या दमाच्या खेळाडूंसह इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा भरारी घेण्यास उत्सुक आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ
जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ॲटकिन्सन, जेकब बिथेल, हॅरी ब्रूक, ब्रेडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हर्टन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशिद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वूड, जेमी स्मिथ.
टी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ
जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ॲटकिन्सन, जेकब बिथेल, हॅरी ब्रूक, ब्रेडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हर्टन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशिद, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वूड, जेमी स्मिथ.