वोक्स, ओव्हर्टन, बेथल यांचे पुनरागमन; पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

भारताविरुद्ध रंगणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने १४ जणांचा चमू जाहीर केला आहे. ख्रिस वोक्स, जेमी ओव्हर्टन या वेगवान गोलंदाजांसह डावखुरा फलंदाज जेकब बेथलचे इंग्लंडच्या संघात पुनरागमन झाले आहे. मार्क वूड व ओली स्टोन दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकणार आहेत, तर जोफ्रा आर्चर मात्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या कसोटीपर्यंत संघात परतू शकतो.
वोक्स, ओव्हर्टन, बेथल यांचे पुनरागमन; पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
Published on

लंडन : भारताविरुद्ध रंगणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने १४ जणांचा चमू जाहीर केला आहे. ख्रिस वोक्स, जेमी ओव्हर्टन या वेगवान गोलंदाजांसह डावखुरा फलंदाज जेकब बेथलचे इंग्लंडच्या संघात पुनरागमन झाले आहे. मार्क वूड व ओली स्टोन दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकणार आहेत, तर जोफ्रा आर्चर मात्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या कसोटीपर्यंत संघात परतू शकतो.

२० जूनपासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला प्रारंभ होईल. या मालिकेद्वारेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) २०२५ ते २०२७ या दोन वर्षांच्या कार्यक्रमास प्रारंभ होईल. ब्रँडन मॅकक्युलमच्या प्रशिक्षणात आणि बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडला आतापर्यंत एकदाही डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे आता आगामी दोन वर्षांत तरी ते कशी कामगिरी करणार, हे पाहणे रंजक ठरेल. जो रूट त्यांच्या फलंदाजीचा कणा असून त्याला स्टोक्स, हॅरी ब्रूक, ओली पोप यांच्याकडून साथ अपेक्षित आहे.

दरम्यान, वोक्स डिसेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अखेरची कसोटी खेळला आहे. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड यांच्या निवृत्तीनंतर तसेच वूडच्या अनुपस्थितीत आता वोक्सवरच इंग्लंडच्या गोलंदाजीची भिस्त आहे. त्यामुळे वोक्स व जोश टंग भारत-अ संघाविरुद्ध शुक्रवारपासून इंग्लंड लायन्स संघासाठीही खेळणार आहे. ३१ वर्षीय ओव्हर्टनला २०२२ नंतर कसोटी संघात स्थान लाभले आहे, तर आयपीएलमध्ये बंगळुरूसाठी छाप पाडल्यावर बेथलही डिसेंबर २०२४नंतर इंग्लंडच्या कसोटी संघात दाखल झाला आहे.

इंग्लंडचा संघ

बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बेथल, हॅरी ब्रूक, ब्रेडन कार्स, सॅम कूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हर्टन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.

logo
marathi.freepressjournal.in